Chinchwad Bye Election : मतदान केंद्राच्या 100 मीटर परिघात निर्बंध लागू

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने मतदान केंद्राच्या (Chinchwad Bye Election) 100 मीटर परिघात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी निर्बंध लागू केले आहेत.

चिंचवड मतदार संघातील पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील चिंचवड, सांगवी, वाकड, हिंजवडी, देहूरोड, रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 87 इमारतीतील 510 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान सुरळीत व शांततेत पार पडावे, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहोचू नये आदींसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Chinchwad News : चोर पकडून देणाऱ्या नागरिकाच्या घरी पुन्हा घरफोडी, 12 लाखांचा ऐवज लंपास

मतदानाचा दिवस 26 फेब्रुवारी रोजी  मतदान प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार या कालावधीत मतदान केंद्राच्या परिघापासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरातील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यिक आस्थापना आदी तत्सम बाबी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच या कालावधीत मतदान केंद्र परिसर आणि मतदान केंद्राच्या आतील भागात कोणत्याही प्रकारची अग्नीशस्त्रे, हत्यारे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून पोलीस दल, संरक्षण दल, तुरुंग विभाग, बँक सुरक्षा विभाग व कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या इतर केंद्रीय तसेच राज्य (Chinchwad Bye Election) शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.