Chinchwad : पुण्याहून अयोध्येला निघालेल्या आस्था स्पेशल ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फोट,प्रवाश्यांमध्ये एकाच गोंधळ

एमपीसी न्यूज – पुणे येथून अयोध्येकडे श्रीरामलल्लांच्या (Chinchwad )दर्शनासाठी निघालेल्या आस्था स्पेशल ट्रेनमध्ये अचानक एक मोबाईल फुटला. मोबाईलला आग लागल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला.

मोबाईल बाहेरून फेकण्यात आल्याची अफवा पसरल्याने काहीकाळ सर्वांचीच धावपळ उडाली. पण मोबाईल चार्गिंगला लावला असताना फुटल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 6) सायंकाळी आठच्या सुमारास चिंचवड ते देहूरोड रेल्वे स्थानक दरम्यान घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे येथून(Chinchwad ) श्रीरामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येसाठी आस्था स्पेशल ट्रेन सोडण्यात आली. ही ट्रेन चिंचवड स्थानकातून मंगळवारी सायंकाळी मार्गस्थ होत असताना चिंचवड ते देहू रोड रेल्वे स्थानकादरम्यान बोगी क्रमांक 20 मध्ये अचानक मोबाईलचा स्फोट झाला.

या रेल्वेत प्रवासी असणाऱ्या पुण्याच्या धनकवडी येथील रहिवासी असलेल्या प्रवासी महिला छाया हरिभाऊ काशिद यांनी हा मोबाईल फुटल्याचे सर्वप्रथम पहिले. सुरुवातीला हा मोबाईल कोणीतरी बाहेरून फेकला असल्याची चर्चा सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला.

Pune : सुहास दिवसे यांची पुण्याच्या नव्या जिल्हाधिकारी पदी वर्णी

या रेल्वेच्या बोगी क्रमांक 18 मध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे जवान होते. गोंधळाचा आवाज एकून त्यांनी बोगी क्रमांक 20 मध्ये धाव घेतली. तत्काळ मोबाइलला लागलेली आग विझविण्यात आली. या जवानांनी चौकशी करीत प्रवाशांना शांत केले. तोपर्यंत रेल्वे लोणावळा स्थानकात पोहचली. तेथून या घटनेची माहिती पुणे आणि ठाणे पोलिसांना देण्यात आली.

रेल्वे घाट उतरून पुढे गेल्यावर, पनवेल स्थानकात रेल्वेचे ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक यांनी “आस्था स्पेशल ट्रेन”मध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी पनवेल रेल्वे स्थानकात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तेथे रात्री 10.22 वाजता जळालेला मोबाइल ताब्यात घेण्यात आला. त्यांनतर काशीद आणि अन्य प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याची खात्री करून, प्रवासी महिला काशीद आणि अन्य प्रवाशांचे जबाब घेण्यात आल्यावर आस्था स्पेशल ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी सकाळ पासून पुणे रेल्वेच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी चिंचवड ते देहूरोड या रेल्वे मार्गावर प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच या घटनेनंतर मंगळवारी रात्री या मार्गावर रेल्वेचे पोलीस कर्मचारी तैनात करून तपासणी केली गेली. याठिकाणी पोलिसांनी केलेल्या दोन दिवसांच्या पाहणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा प्रकार आढळून आला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पुणे रेल्वेचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी म्हणाले, “मोबाईल अधिक चार्जिंग केल्याने गरम होऊन फुटल्याची प्राथमिक शक्यता फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नाही. तसेच यामध्ये कोणी जखमी झालेले नाही. रेल्वेच्या बोगीत कोणतेही नुकसान झालेले नाही. याबाबत गुन्हा दाखल करून, तपास सुरू करण्यात आला आहे. प्रवासी सुखरुपपणे पुढील प्रवासाला रवाना झाले आहेत.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.