Chinchwad Crime News : कुरुळीतील कंपनीत दरोडा घालणारी टोळी गजाआड; 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – कंपनीतील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून तसेच डोळ्यात मिरची पावडर टाकून कंपनीत दरोडा घालणाऱ्या टोळीला म्हाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चोरलेले साहित्य विक्रीसाठी आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी नऊ जणांना अटक केली असून त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. अटक आरोपींकडून 33 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रोहन विजय सूर्यवंशी (वय 28, रा. कासारवाडी), राहुल अंकुश क्षीरसागर (वय 21, रा. काळा खडक वाकड), रतन महादेव दनाने (वय 19, रा. तळेगाव दाभाडे), अन्सार जुल्फीकार खान ( वय 25, रा. दापोडी), अब्दुल सत्तार करिम (वय 23, रा. दापोडी), अरबाज रईस शेख (वय 20, रा. दापोडी), मीना अंकुश क्षीरसागर (वय 40, रा. काळा खडक, वाकड), अर्जुन मोहनलाल भट (वय 24, रा. चिखली), विद्या मनोज मगर (वय 23, रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. किरण गिरी, हर्षद खान हे दोघेजण सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जून रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजताच्या कालावधीत आरोपींनी कुरुळी येथील व्ही.टेक इंडस्ट्रीज इंडीया प्रा. लि. या कंपनीच्या कंपाऊंड वॉलवरुन कंपनीच्या आवारात प्रवेश केला. दरोडेखोरांनी हातामध्ये चाकू, कटावणीसह प्रवेश करून सिक्युरिटी गार्डना चाकूचा धाक दाखविला आणि तोंडावर मिरची पुड टाकून हाताने मारहाण करून अंगावर चादर टाकून डांबून ठेवले.

दरोडेखोरांनी कंपनीमधील तांबे, पितळ या धातुचे टर्मिनल, लग्ज, वायरिंग, हार्नेस असे स्पेअर पार्ट आणि सिक्युरिटी गार्डचे तिन मोबाईल फोन, असा एकूण 25 लाख 87 हजार 247 रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून लुटून नेला. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

घटनेची माहिती म्हाळुंगे पोलिसांना माहिती झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी तीन पथके तयार केली. तिन्ही पथकांनी आरोपींचा वेगवेगळ्या पातळ्यांवर शोध सुरू केला. दरोडेखोरांनी चोरलेला माल एका टेम्पोमधून नेला असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना दिली होती.

त्यानुसार तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी टेम्पो मालकाची माहिती काढली. टेम्पो मालक आणि खब-यांकडून म्हाळुंगे पोलिसांना माहिती मिळाली की, दरोडेखोर लुटलेला माल विकण्यासाठी यमुनानगर निगडी येथे गेले आहेत.

त्यानुसार पोलिसांनी यमुनानगर परिसरात सापळा लावला. लुटलेला माल एका ट्रान्सपोर्ट गोडाऊनमध्ये विकत असताना पोलिसांनी आरोपींची रंगेहाथ धरपकड केली. दरम्यान आरोपी आणि पोलीस यांच्यात झालेल्या झटापटीत दोन आरोपी पळून गेले. पोलिसांनी नऊ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यामध्ये दोन महिला दरोडेखोरांचा सहभाग आहे.

अटक केलेल्या दरोडेखोरांकडून 25 लाख 75 हजार 547 रुपयांचे तांबे-पितळ या धातुचे स्पेअर पार्ट, चार लाख रुपये किमतीचा टेम्पो (एम एच 14 / जी डी 7827), दोन लाख 90 हजारांच्या तीन दुचाकी, 67 हजारांचे सात मोबाईल फोन, सुरक्षा रक्षकाचा काढून घेतलेला 1500 रुपयांचा एक मोबाईल, 650 रुपयांचे कटावणी, चाकू, मिरची पूड, असा एकूण 33 लाख 34 हजार 697 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, सुरेश यमगर पोलीस अंमलदार चंदु गवारी, राजु कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामन सांगडे, शरद खैरे, प्रितम ढमढेरे, जयकुमार शिकारे, साहेबराव टोपे, सोनम खंडागळे यांनी केली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश चिट्टमपल्ले करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.