Chinchwad : अवघ्या अडीच महिन्यात वाहतूक पोलिसांनी उतरवले पाच हजार फॅन्सी नंबर प्लेट आणि मॉडिफाइड सायलेन्सर

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांचे (Chinchwad) उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम जोरात सुरु आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून चौकाचौकात नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मागील अवघ्या अडीच महिन्यात वाहतूक पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट प्रकरणी तीन हजार 573 तर मॉडिफाइड सायलेन्सर प्रकरणी एक हजार 464 अशा एकूण 5 हजार 37 जणांवर कारवाई केली आहे.

मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 52 नुसार वाहनांमध्ये विना परवानगी फेरबदल करणे, केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नियम 50, 51 अन्वये वाहनाची नंबर प्लेट बदलणे गुन्हा असल्याचे सांगण्यात आले आहे. या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. अनेक गुन्हेगार बनावट नंबर प्लेट किंवा फॅन्सी नंबर प्लेट वाहनांना बसवून त्यांचा गुन्ह्यामध्ये वापर करतात. त्यामुळे अशी वाहने व आरोपी तात्काळ मिळून येत नाहीत. त्याचप्रमाणे नंबर प्लेटचा बोध न झाल्याने मोटार वाहन कायद्यानुसार करण्यात येणाऱ्या कारवाईत व्यत्यय येतो.

जानेवारी ते 10 मार्च 2024 या कालावधीत पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या तीन हजार 573 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर 25 लाख 80 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

Vasant More : अखेरचा जय महाराष्ट्र…साहेब मला माफ करा…वसंत मोरे यांचा मनसे पदाचा राजीनामा

विशिष्ट कारणांसाठी वाहनांच्या संरचनेत बदल करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र तुझ्यापेक्षा माझा आवाज मोठा, या अविर्भावात अनेकजण वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मोठमोठे आवाज काढतात. अशा वाहनांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. लहान मुले, वयस्कर नागरिक, रुग्णालयातील रुग्ण, शाळा यांसारख्या ठिकाणी (Chinchwad) याचा जास्त त्रास होतो. ध्वनी प्रदूषण होते. हे दुचाकीस्वार अचानक मोठा आवाज करून नागरिकांना घाबरवत असतात. त्यामुळे अचानक गोंधळ उडतो. ध्वनी प्रदूषणासह अपघात, वाहतूक कोंडी अशाही समस्या उद्भवतात.

जानेवारी ते 10 मार्च 2024 या कालावधीत पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी मॉडिफाइड सायलेन्सर प्रकरणी एक हजार 464 जणांवर कारवाई करत त्यांच्यावर 14 लाख 63 हजार रुपयांचा दंड लावला आहे.

पालकांना होऊ शकतो दंड, तुरुंगवास मोटार वाहन कायदा (सुधारित) 2019 नुसार, अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना दंड आणि तुरूंगवास होऊ शकतो. हा तुरूंगवास तीन वर्षांपर्यंत आहे. याचबरोबर 25 हजार रूपये दंडाचीही तरतूद आहे. तसेच, त्या अल्पवयीन मुलाला वयाची 25 वर्षे पूर्ण होईपर्यंच वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नाही. त्यामुळे आपल्या अल्पवयीन मुलाच्या अथवा मुलीच्या हाती वाहन सोपवत असाल तर पालकांनी सावध होणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.