BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : महापुरुषांचा आदर्श समोर ठेऊन समाजकारण केल्यास भविष्यातील दॄष्टे महापुरुष घडतील; सिध्दनाथ घायवट (जोशी) यांचे प्रतिपादन

0

एमपीसी न्यूज – आजची तरुण पिढी महापुरुषांच्या नावाने राजकारण करण्यात अग्रेसर बनत चालली आहे. त्यामुळेच शेकडो वादंग तथा वादविवाद होत आहेत. आजची तरुण पिढी ही वेगळ्या वळणाकडे मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे युवकांनी महापुरुषांच्या नावाने राजकारण करण्याऐवजी समाजकारणावर भर द्यावा. यातून भविष्यातील दॄष्टे महापुरुष घडतील, असे प्रतिपादन सिध्दनाथ घायवट (जोशी) यांनी केले.

स्वामी विवेकानंद विचारमंच चिंचवड यांच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती तथा राष्ट्रीय युवा दिन आणि राजमाता जिजाऊ जयंती रावेत येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमात राज्यस्तरीय युवा समाजभूषण पुरस्कारार्थी तथा स्वामी विवेकानंद विचारमंचाचे कार्याध्यक्ष सिध्दनाथ घायवट (जोशी) यांचे ‘आजचा युवक – आजचा नागरिक’ या विषयावर युवकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमासाठी युवा उद्योजक सचिन देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते इलियास पटेल रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी तथा युवक-युवती व नागरिक उपस्थित होते.

थोर महापुरुषांनी आपले जीवन समाजहितासाठी, धर्महितासाठी व राष्ट्रहितासाठी व्यतित केले आहे. आज या घडीला युवकांनी महापुरुषांचे जीवनचरित्र अत्यंत बारकाईने अभ्यासायला हवे व त्यामधून आपल्या हस्ते समाजहित, धर्महित तथा राष्ट्रहित हे कसे साधले जाऊ शकते, याचाही विचार करायला हवा आणि त्या अनुषंगाने कार्यतत्पर व्हायला हवे.

सिध्दनाथ घायवट म्हणाले, आजचा युवक हा आजच्या आधुनिक जगातील नागरिक आहे. तो सदृढ, सशक्त, प्रगल्भ व सुविचारक्षम आहे. फक्त युवकांनी बुध्दीजीवी लोकांच्या संपर्कात राहून बुध्दीजीवी बनायचे की बुध्दीवादींच्या संपर्कात राहुन बुध्दीचातुर्याने समाजमनावर अधिराज्य गाजवायचे हे मात्र, युवकांच्या हाती आहे.

घायवट यांनी व्याखानादरम्यान स्वामी विवेकानंदाच्या जीवनचरित्रातील महत्वपूर्ण गोष्टींचा उलगडा करुन सहज साध्या भाषेत स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडले. त्याचबरोबर राजमाता जिजाऊंमुळे शिवबा हे छत्रपती शिवराय बनले. त्यामुळे समाजातील प्रत्येक स्त्री ही आपल्यासाठी माता-भगिनी आणि मार्गदर्शक असल्याचे समजून जीवन व्यतित करायला हवे, असेही ते म्हणाले.

  • कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रध्दा कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. अमोल पाटील यांनी केले. प्रा.दिपक कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद विचारमंचाचे मुख्य सल्लागार प्रा. डाॅ. सुनिल इंगोले, अध्यक्ष प्रा. डाॅ. अर्चना आहेर, सुनिता घोडे, जावेद मुल्ला, लक्ष्मण शेलार, दयानंद मोरे, योगेश्वरी महाजन, सिध्देश्वर इंगळे, यशवंत माने, नितीन बनाईत, सुरेखा वागळेकर, सौरभ लादगेकर, श्वेता बनाईत, अशोक जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3