Chinchwad : पोलीस आयुक्तालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – बहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बाजू जाणून घेण्यासाठी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावले. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना कोणीतरी पोलीस आयुक्तांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यावेळी महिलेने पोलीस आयुक्तालयासमोर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर घडली.

अनिता गायकवाड (वय 50) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार हनुमंत बांगर यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता यांना पाच बहिणी आहेत. त्यातील एका बहिणीने संपत्तीची वाटणी मागितली. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू होते. वाटणी मागणा-या बहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्याबाबत बोलण्यासाठी पोलिसांनी अनिता यांना पोलीस चौकीत बोलावले. अनिता पोलीस चौकीत गेल्या. मात्र त्यांना तिथे कोणीतरी पोलीस आयुक्तांना भेटण्याचा सल्ला दिला.

त्यामुळे त्या थेट चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आल्या. दरम्यान आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारावर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहिला आणि आणि त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखले. अनिता यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.