Chinchwad News : स्त्री जन्माचे अनोखे स्वागत ! 29 तारखेला जन्मलेल्या कन्यारत्नासाठी 29 समाजोपयोगी उपक्रमांची सलामी

एमपीसीन्यूज (गोविंद बर्गे ): मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून होणारा छळ… नकोशी म्हणून केला जाणारा तिरस्कार…त्यातही कहर म्हणजे मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या… अशा अनेक घटना आपण नेहमी ऐकत आणि वाचत असतो. पण, सध्या मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या अनेक सुखद घटनाही समोर येत आहेत. चिंचवडच्या पूर्णानगरमधील गर्ग कुटुंबियांनी आपल्या कन्यारत्नाचे फटाक्यांच्या आतषबाजीत धुमधडाक्यात स्वागत केले. शिवाय 29 तारखेला मुलीचा जन्म झाल्याने विविध 29 सामोजोपयोगी उप्रक्रम राबवून तिला अनोखी सलामी देण्यात आली.

समीक्षा गर्ग, असे या कन्येचे नाव आहे. विकास गर्ग आणि सरिता गर्ग या सेवाभावी दाम्पत्याच्या पोटी २९ सप्टेंबरला तिचा जन्म झाला. या दाम्पत्याला परिणीती ही दोन वर्षांची मुलगी आहे. आधी मुलगी असतानाही दुसऱ्यांदा मुलगी झाली म्हणून गर्ग दाम्पत्य नाराज झाले नाही. उलट दोन्ही मुलीच झाल्याचा आनंद आणि अभिमान असल्याचे ते सांगतात. पहिल्या मुलीच्या जन्माचे स्वागतही त्यांनी धुमधडाक्यात केले होते.

गेल्या महिन्यात म्हणजेच 29  सप्टेंबरला गर्ग दाम्पत्याला कन्यारत्न झाले. दुसरीही मुलगीच झाली म्हणून त्यांनी तिचे अनोखे स्वागत केले. संभाजीनगर येथील रुग्णालयापासून पूर्णानगर येथील गर्ग यांच्या निवासस्थानपर्यंत तब्बल 20 वाहनांच्या ताफ्यात मिरवणुकीद्वारे त्यांनी मुलीचे स्वागत केले.

निवासस्थानजवळ वाहनांचा ताफा दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी व मिठाईचे वाटप करण्यात आले. रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या. दरवाजात औक्षण करण्यात आले. एका कन्येचा हा राजेशाही स्वागत समारंभ पाहून पूर्णानगरवासियांचे डोळे दिपून गेले नसतील तरच नवल !.

मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी गर्ग दाम्पत्याने तिच्या 29 या जन्मदिनांकानुसार 29  सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एकूण 29 समाजोपयोगी उपक्रमाची काल ( गुरुवारी) २९ ऑक्टोबरला सांगता झाली.

मुलीच्या जन्माच्या दिवशी अनाथ मुलांना खाऊ वाटप करुन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तर सांगता वृक्षरोपांचे वाटप करुन करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ अग्र सफायर आणि पूर्णानगर विकास कृती समिती या दोन्ही संस्थांच्या सहकार्याने हे सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले.

या उपक्रमांमध्ये कोविड रुग्णांना आवश्यक औषधांचे किट, डॉक्टर, नर्स यांना पीपीई किट, गोरगरीब नागरिकांना मोफत धान्य, रक्तदान शिबीर, गो शाळेला मदत, कोरोना संकट काळात गरजू नागरिकांना मदत करणाऱ्या कोरोना योद्धयांचा सन्मान, गृहनिर्माण सोसायट्यांचे सॅनिटायझेशन, चष्मे वाटप, निराधार आणि विधवा महिला, सफाई कामगार, घंटागाडी कर्मचारी आदींना धान्य, सॅनिटायझर, मास्क, अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, नवरात्रौत्सवात महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान, आरोग्य तपासणी शिबीर, वायसीएम रुग्णालयातील कोरोना रुग्णांना जेवण, रिक्षा चालकांना पार्टीशन शीटचे वाटप आदी विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

खरे म्हणजे स्त्री ही पुरूषांपेक्षा कोठेही कमी नसते. पुरुष करतात ती सर्व कामे आता महिलाही करीत आहेत. किंबहुना काही कामात तर मुलांपेक्षा मुली आणि पुरूषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. समान सवलती आणि साधने उपलब्ध असूनही मुली मुलांपेक्षा काकणभर सरस ठरतात. मुलींमध्ये कोणत्याही प्रश्‍नाचे गांभीर्य लवकर बिंबते आणि देशाच्या विकासामध्ये या पुढच्या काळात मुलींचा म्हणजेच महिलांचा वाटा मोठा असणार आहे. आम्ही आमच्या मुलींना उच्च शिक्षण देणार आहोत. त्यांच्या प्रत्येक आवडीनिवडी पूर्ण करण्याला प्राधान्य देऊ. भविष्यात मुलींच्या कार्यकर्तृत्वानेच आम्हाला समाजात ओळख मिळावी, अशी आमची इच्छा आहे. विकास गर्ग, सरिता गर्ग.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.