Chinchwad : देशाचा सक्षम आणि सक्रिय नागरिकच सुवर्णयुगाच्या स्वप्नांचा ध्यास घेईल -अविनाश धर्माधिकारी

458 व्या श्रीमन महासाधु श्री मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळ्यात व्याख्यान

एमपीसी न्यूज – भारत देशाचा सक्षम आणि सक्रिय नागरिक भारताच्या सुवर्णयुगाच्या स्वप्नांना गवसणी घालेल. हा नागरिक जबाबदारीने त्याची कर्तव्ये पार पाडेल. प्रत्येकजण देशहितासाठी खारीचा वाटा उचलेल, असे मत पूर्व आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

श्रीमन महासाधु श्री मोरया गोसावी यांच्या 458 व्या जयंतीनिमित्त अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज उपस्थित होते.

अविनाश धर्माधिकारी म्हणाले, “भारताच्या एकसंघतेचा वारसा हजारो वर्षांचा आहे. साधू, संतांनी आपली संस्कृती जपली आहे. त्यांनी आपल्याला संस्कृतीचा भव्य वासरा दिला आहे. अनेक परकीय आक्रमणांना परतवून लावण्याची ताकद या वारशामध्ये आहे. शक, कुशाक, ग्रीक, हुन, अरबी अशा अनेक सत्तांनी भारतावर आक्रमण केले. पण भारतीय संस्कृतीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. कालांतराने ते भारताचे बनले. ही आपल्या संस्कृतीची ताकद आहे.

एकसंघ भारत ही भविष्याची जागतिक महासत्ता होऊ शकते. ही भीती इंग्रजांना होती. यासाठी इंग्रजांनी भारतात फूट पाडली. पण स्वातंत्र्याच्या वेळी सगळी संस्थाने खालसा करून भारतात सामील झाली. यामुळे पुन्हा भारत एकसंघ झाला. सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका यासाठी महत्वाची ठरली. 5 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीर बाबत असलेले 370 आणि 35 (अ) कलम रद्द करून काश्मीरची दुखरी जखम देखील आता बरी झाली आहे.

निवडणुकांमध्ये आजही काळा पैसा गटाराच्या पाण्यासारखा वाहतो. दिलेली आश्वासने पूर्ण केली जात नाहीत. ही लोकशाहीची दुखरी बाजू आहे. असं असलं तरी मतदार जागृत आहे. त्याला कोणी काहीही सांगितलं तरी तो स्वतःच्या मनाप्रमाणेच वागतो. लोकशाही हे आधुनिक भारताचे बळ आहे. भारतात बाह्य विविधता आहे. पण अंतर्गत ती एकताच आहे. ही एकताच भारताला सुवर्णयुगाकडे घेऊन जाणार आहे.

भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती सुवर्णयुगाचा एक प्रमुख घटक आहे. भारतात स्वातंत्र्यानंतर 88 टक्के लोक दारिद्र्य रेषेच्या खाली होते. तर देशात केवळ 11 टक्के साक्षरता होती. अशा देशाने जगात सर्वाधिक ताकदीचे पीएसएलव्ही यान अवकाशात सोडले आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपण जगाच्या पुढे आहोत, हे सिद्ध झाले आहे. भारताच्या उत्थानासाठी प्रत्येकाची जबाबदारी महत्वाची आहे.

देशाचा प्रत्येक नागरिक आपले कर्तव्य चोखपणे बजावेल तेंव्हा भारत महासत्ता बनेल. जगाला अध्यात्म, संस्कृती, नैतिकता आणि शांतीचा संदेश देणारा भारत आहे. हे विचार प्रत्येक भारतीयांच्या जीवनात दिसायला हवा. त्याच वेळी भारतात नवे सुवर्णयुग सुरू होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

विश्राम देव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.