Chinchwad : दिगंबर रौंधळ यांना ‘श्याम’ तर, भामाबाई रौंधळ यांना ‘श्यामची आई’ पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद भोसरी यांच्या वतीने देण्यात येणारा ‘श्याम’ पुरस्कार यावर्षी पुणे महसूल विभागाच्या उपनिबंधक दिगंबर रौंधळ यांना तर त्यांच्या मातोश्री भामाबाई रौंधळ यांना ‘श्यामची आई’ पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवारी (दि. 20) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात दुपारी चार वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

आदर्श ग्राम संकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते सोहळ्याचे उदघाटन होणार आहे. माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी या समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘आईच्या संस्कारातून घडलेले साने गुरुजी’ या विषयावर गुणवंत कामगार बाजीराव सातपुते यांचे व्याख्यान होणार आहे.

साने गुरुजी श्रम साधना पुरस्कारासाठी कामगार नेते दत्तात्रय येळवंडे यांची निवड झाली आहे. साने गुरुजी संस्कार शाळा सन्मान भोसरीतील शेठ रामधारी आगरवाल विद्यालयाला प्रदान करण्यात येणार आहे. तर रुपीनगर येथील ज्ञानदीप विद्यालयाला यशवंतराव चव्हाण बहुजन हिताय सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.

पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, आशिया मानवशक्ती विकास संस्था, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, लायन्स क्लब भोजपुरी गोल्ड, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद भोसरी यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.