Chinchwad : आयुक्तांच्या कान टोचणीमुळे प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यावर पोलिसांचा भर

एमपीसी न्यूज – दाखल असलेले गुन्हे अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे कान टोचले. त्यानंतर मागील दोन महिन्यात सर्वच पोलीस ठाण्यात प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यावर भर दिला. बहुतांश गुन्ह्यांचा निपटारा झाल्याने कान टोचणीचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण अतिशय जादा होते. गेल्या दोन बैठकीत आयुक्‍तांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्‍त करीत पोलीस निरीक्षकांना याबाबत तंबी दिली होती. मात्र यावेळी झालेल्या आढावा बैठकीत प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. दर महिन्याला होणाऱ्या बैठकीत आयुक्त महिनाभराच्या सर्व बाबींचा आढावा घेतात.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत बहुतांश गुन्ह्यांचा तपास प्रलंबित गुन्ह्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. हे प्रमाण कमी करण्याच्या सूचना आयुक्‍तांनी दिल्या होत्या. त्यानंतरच्या महिनाभरात यामध्ये विशेष बदल झाले नाहीत. यामुळे त्यानंतरच्या बैठकीत आयुक्‍तांनी पोलीस निरीक्षक आणि त्यावरील अधिकाऱ्यांचे कान टोचले. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याबाबत पाठपुरावा करीत प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण अतिशय कमी केले. यामुळे गुरुवारी (दि. 27) झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली नाही.

दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या हिंसाचाराच्या चित्रफिती सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात याबाबतचे पडसाद उमटणार नाहीत, याकडे पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. यापूर्वी शहरात झालेल्या दंगलीमधील आरोपींवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अशा आरोपींच्या हालचालींवर पोलिसांनी गुप्तपणे नजर ठेवावी, अशा सूचनाही आयुक्‍तांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच इतर गुन्ह्यातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असेही पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.