Chinchwad : रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अंगावरून रेल्वे जाऊनही वाचले प्रवाशाचे प्राण

एमपीसी न्यूज – रेल्वेतून प्रवास करताना चक्कर येऊन एक प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडला. त्याच्या अंगावरून इंजिन आणि रेल्वेचे डबे गेले. मात्र ट्रॅकच्या मधोमध पडल्यामुळे या प्रवाशाला इजा झाली नाही. रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून रेल्वे थांबवली आणि पडलेल्या प्रवाशाला मृत्यूच्या दाढेतून परत काढले. ही घटना आज (बुधवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास चिंचवड रेल्वे स्टेशन येथे घडली.

प्रकाश भागवत माळी (वय 38, रा. शहापूर, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) बचावलेल्या प्रवाशाचे नाव आहे.

रेल्वे पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुणे-पनवेल पॅसेंजर चिंचवड रेल्वे स्थानकावर आली. या रेल्वेने प्रकाश माळी प्रवास करत होते. ते मध्यप्रदेश मधून चिंचवड येथे कामाच्या शोधात आले आहेत. चिंचवड रेल्वे स्थानकावर गाडी थांबण्याच्या वेळी प्रकाश यांना चक्कर आली आणि ते खाली रेल्वे ट्रॅकवर पडले. ट्रॅकच्यामध्ये पडलेल्या प्रकाश यांच्या अंगावरून रेल्वे इंजिन आणि तीन डबे गेले.

ही घटना रेल्वे पोलीस हवालदार अनिल बागुल आणि पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम वाळेकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ रेल्वे थांबवली. काही क्षणात रेल्वे थांबवून प्रकाश याना बागुल आणि वाळेकर यांनी सुखरूपपणे बाहेर काढले. कामाच्या शोधात आलेल्या प्रकाश यांना काम मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी काहीही खाल्ले नाही. यातून अशक्तपणा आल्याने त्यांना चक्कर आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी प्रकाश यांना चिंचवड पोलीस चौकीत नेऊन त्यांना जेवण दिले. त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत पाठवून दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.