Chinchwad : सवलतीच्या दरात मिळणारी औषधे खेळताहेत रुग्णांच्या जीवाशी खेळ !

चिंचवडच्या आदित्य बिर्ला रुग्णालयाची अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार

एमपीसी न्यूज- आजकाल बाजारामध्ये औषधांच्या काही दुकानांमध्ये सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध झाली असून या औषधांनी रुग्णाच्या जीवाशी खेळ चालविला असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत चिंचवडच्या आदित्य बिर्ला रुग्णालयाने अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, आजकाल बिर्ला हॉस्पिटलच्या आसपास असलेल्या औषधांच्या दुकानांमध्ये सवलतीच्या दरामध्ये औषधांची विक्री केली जात आहे. मात्र या औषधांचा रुग्णांच्या आरोग्यावर अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या औषधांच्या इंजेक्शनमुळे रुग्णांच्या तब्येतीमध्ये काहीही फरक पडत नसल्याची तक्रार रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाकडे केली होती. विशेषतः डायलिसिसच्या रुग्णांवर या औषधांचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. ज्यावेळी हा सर्व प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आला त्यावेळी त्यांनी या सर्व प्रकारचा शोध घेतला.

प्रशासनाने थेरगाव येथील एका औषधाच्या दुकानात एक बनावट ग्राहक पाठवून काही औषधे मागवून घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे दुकानदाराने 1726 रुपयांचे बिल देऊन ग्राहकाकडून फक्त 500 रुपये घेतले. याचाच अर्थ मिळालेली औषधे बनावट किंवा निकृष्ट दर्जाची असावीत अशी शंका रुग्णालय प्रशासनाला आली. त्याची शहानिशा करण्यासाठी ती सर्व औषधे घेऊन संबंधित दुकानात परत गेले असता दुकानदाराने त्यांच्यासमोर औषधांची किंमत दुरुस्त केली तसेच दुकानातील विक्री रजिस्टरमध्ये तशी सुधारणा करून त्यासंबंधीचे पत्रही दिले. दिलेल्या बिलावर जीएसटी क्रमांक देखील नसल्याचे निदर्शनास आले आहे.

रुग्णालय प्रशासन आणि येथील डॉक्टर यांच्यावर रुग्णाच्या आरोग्याची मोठी जबाबदारी असते. रुग्णालयात दररोज अनेक रुग्णांवर औषधोपचार केले जातात. अशावेळी या औषधांमुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. यासाठी आपल्या विभागामार्फत या संपूर्ण प्रकाराचा तपास करून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.