Chinchwad : वेदनांना सुगंधित करण्याचे सामर्थ्य  साहित्यात – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज – वेदनांना सुगंधित करण्याचे सामर्थ्य शोभा जोशी यांच्या साहित्यात आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक  गिरीश प्रभुणे (Chinchwad) यांनी काढले.

चिंचवड येथे आदर्श शिक्षिका, कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शोभा जोशी यांच्या अमृतमहोत्सवोत्तर गौरव सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रभुणे बोलत होते. पिंपरी – चिंचवड शहरातील सुमारे पंचवीस साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन स्थापन करण्यात आलेल्या कवयित्री शोभा जोशी गौरवसोहळा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, प्रा. तुकाराम पाटील, सुरेश कंक यांच्या व्यासपीठावरील प्रमुख उपस्थितीत स्मृतिचिन्ह आणि मानपत्र प्रदान करून शोभा जोशी यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, “साहित्यातील सर्व क्षेत्रांत अन् सर्व गटांत सहज वावर हे शोभा जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य आहे!” प्रा. तुकाराम पाटील यांनी आपल्या मनोगतातून सर्व साहित्यिकांच्या वतीने शोभा जोशी यांचे अभीष्टचिंतन केले. किसनमहाराज चौधरी यांनी, “असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक भरभक्कम वीट होण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे!” अशा शब्दांत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला; तर सुरेश कंक यांनी शोभा जोशी यांनी एक साहित्यिक कार्यकर्ती म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल विविध आठवणींना उजाळा दिला.

Pune : खडकवासला धरणातून मुठा नदीत एक हजार क्युसेक्सने होणार विसर्ग

नितीन जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करून आणि स्नेहा इंगळे या युवतीने नृत्यातून सादर केलेल्या गणेशवंदनेने (Chinchwad) कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. नंदकुमार मुरडे यांनी प्रास्ताविक केले. सुभाष चव्हाण यांनी मानपत्राचे वाचन केले. अभय पोकर्णा यांनी सुरेल आवाजात सादर केलेल्या अभीष्टचिंतनपर गीताच्या पार्श्वभूमीवर पंचसुवासिनींनी सत्कारमूर्तीला विधिवत औक्षण केले.

याप्रसंगी विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी शोभा जोशी यांच्या साहित्यावर आधारित विविध कलांचे सांगीतिक सादरीकरण केले. त्यामध्ये श्रेहान वर्मा (‘पंढरीची वारी’ – पार्श्वगायन राधाबाई वाघमारे), आत्रेय गांधलीकर (‘आमचं पालावरचं जिणं…’), न्यू इंग्लिश स्कूल, माण येथील विद्यार्थी (भारूड), पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थी (बालकविता आणि प्रबोधनगीते), डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी (लावण्या) अशा वैविध्यपूर्ण कलाविष्कारांनी उत्तरोत्तर इतकी रंगत वाढली की, उपस्थित रसिकांना उत्स्फूर्तपणे नृत्याचा ठेका धरायला भाग पाडले. प्रदीप गांधलीकर यांनी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून शोभा जोशी यांच्या बहुरंगी अन् बहुढंगी कारकिर्दीची वाटचाल रसिकांपुढे उलगडली.

समन्वयक सुहास घुमरे आणि अशोकमहाराज गोरे यांच्यासह पिंपरी – चिंचवड साहित्य संवर्धन समिती, समरसता साहित्य परिषद, शब्दधन काव्यमंच, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, स्वयंसिद्धा प्रतिष्ठान, संवेदना प्रकाशन, महाराष्ट्र साहित्य परिषद (पिंपरी – चिंचवड शाखा), नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, दिलासा, मातंग साहित्य परिषद, मधुश्री कला आविष्कार, रुद्रंग, कलारंजन प्रतिष्ठान, काव्यात्मा साहित्य परिषद, गझलपुष्प, आम्ही सावित्रीच्या लेकींचा मंच, संस्कृती संवर्धन महासंघ, एल्गार साहित्य परिषद, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, प्रणाली प्रकाशन, पिंपरी – चिंचवड साहित्य मंच, समरसता गतिविधी मंच इत्यादी पंचवीस साहित्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सविता इंगळे आणि मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. कैलास भैरट यांनी आभार (Chinchwad) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.