BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-यांना पोलीस बंदोबस्त दिल्याप्रकरणी उपायुक्तांच्या चौकशीचे आदेश

पोलीस आयुक्तांनी दिले पोलीस उपायुक्तांच्या चौकशीचे आदेश

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – दोन बांधकाम व्यावसायिकांचा एका जमिनीबाबत वाद सुरु आहे. हा वाद न्यायालयीन प्रक्रियेत आहे. न्यायालयाने संबंधित जागेबाबत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही त्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने सरकारी मोजणी आणली. या मोजणीला पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी बंदोबस्त दिला. कोणत्याही ठिकाणी बंदोबस्त देण्याचा अधिकार पोलीस आयुक्तांना असताना उपायुक्तांनी परस्पर बंदोबस्त दिला. याप्रकरणी उपायुक्त नम्रता पाटील यांच्या चौकशीचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिले.

पिंपळे सौदागर परिसरात एका जमिनीबाबत वाधवानी आणि आसवानी या दोन बांधकाम व्यावसायिकांमध्ये न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयाने संबंधित जागेबाबत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाचा भंग करून वाधवानी यांनी जमिनीची सरकारी मोजणी आणली. या मोजणीसाठी पोलीस उपायुक्‍त नम्रता पाटील यांनी बंदोबस्त दिला. या मोजणीला आसवानी यांनी आक्षेप घेतला. मात्र तरीदेखील वाधवानी यांनी पोलिसांच्या मदतीने मोजणी सुरू ठेवली. या मोजणीला आक्षेप घेणाऱ्या आसवानी यांच्या दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली.

घडलेल्या प्रकाराबाबत बांधकाम व्यावसायिक श्रीचंद आसवानी यांनी पोलीस आयुक्‍तांकडे तक्रार केली. यानंतर पोलीस आयुक्तांनी सांगवी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक निरीक्षक योगेश आव्हाड यांच्यासह पाच अधिकाऱ्यांची आणि पोलीस उपायुक्‍त नम्रता पाटील यांची बदली केली. तसेच आसवानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने पोलीस आयुक्‍तांना याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “पोलीस बंदोबस्त देण्याचा अधिकार हा फक्‍त पोलीस आयुक्‍तांनाच आहे. मात्र तरीही उपायुक्तांनी जमिनीच्या मोजणीसाठी न्यायालयाचा ‘जैसे थे’ आदेश असतानाही परस्पर बंदोबस्त दिला. याशिवाय सांगवी पोलिसांच्या कारभाराबाबत आणखीही काही तक्रारी आल्या होत्या. यामुळे सांगवी पोलीस ठाण्यातील दोन निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि एक उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस उपायुक्‍तांची बदली केली आहे. याशिवाय याबाबत पोलीस उपायुक्‍तांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. याशिवाय सांगवी पोलिसांच्या कारभाराबाबत आणखीही काही तक्रारी आल्या होत्या.”

HB_POST_END_FTR-A4

.