Chinchwad : भीषण स्फोटानंतर आली जाग; बेकायदेशीर गॅस रिफिलिंगबाबत किरकोळ कारवायांना सुरुवात

एमपीसी न्यूज – ताथवडे येथे टँकरमधून अवैधरित्या गॅस काढून घेत (Chinchwad)असताना सिलेंडरचे एका पाठोपाठ नऊ मोठे स्फोट झाले. या प्रकरणाचा राज्यभर गवगवा झाला. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी तोंडदेखली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. चाकण येथे एका व्यक्तीला बेकायदेशीरपणे गस रिफिलिंग करताना पकडण्यात आले आहे. असे असले तरी मागील नऊ महिन्यांमध्ये मात्र अगदी बोटांवर मोजण्या एवढ्याच कारवाया झालेल्या आहेत.

मोठ्या घटनेनंतर नावापुरती कारवाई
ताथवडे येथे प्रोपिलीन गॅस भरलेल्या टॅंकर (कॅप्सूल) मधून गॅस चोरी करताना(Chinchwad) दुर्घटना घडली. त्यात नऊ सिलेंडरचे स्फोट झाले. या भीषण दुर्घटनेत टेम्पोसह शेजारी असलेल्या तीन स्कूल बस जळाल्या. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नावापुरती कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. धोकादायकपणे मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरी केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी मंगळवारी (दि. 10) सायंकाळी आंबेठाण रोड, चाकण एय्थे एका व्यक्तीवर कारवाई केली. ज्ञानेश्वर हुलवळे (वय 68, रा. आंबेठाण रोड, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 420, 285, जीवनावश्यक वस्तू कायदा, पुरवठा व वितरण नियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Charholi : वाघेश्वर मंदिर परिसरात होणार ‘परंपरा-संस्कृती जतन’

 

अवैधरीत्या गॅस चोरीचे प्रकार शहरात सर्रास होत आहेत. मात्र त्याकडे अनेकदा डोळेझाक केली जाते. पोलिसांकडून देखील यावर तोंडदेखली कारवाई केली जाते. चालू वर्षात नऊ महिन्यात अवैधरीत्या गॅस चोरी प्रकरणी अवघ्या 12 गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात 24 जणांना अटक करून त्यांच्याकडून 13 लाख 14 हजार 8 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर त्यात 10 लाख 96 हजार 8 रुपयांचे केवळ सिलेंडर आहेत.

कामगारनगरीत परवडणारा बर्नर सिलेंडर
पिंपरी-चिंचवड शहरात कामानिमित्त राज्याबाहेरून आलेल्या कामगारांची संख्या प्रचंड आहे. हे कामगार सहसा बर्नर सिलेंडर वापरतात. सिलेंडरवर बर्नर लावलेला असतो, त्यावरच स्वयंपाक करता येतो. यामुळे गॅस शेगडीचे पैसे वाचतात. शिवाय हा सिलेंडर कुठेही न्यायला सोपा जातो. यामध्ये दोन ते पाच किलो पर्यंत गॅस बसतो. याची रिफिलिंग कुठल्याही सुरक्षित ठिकाणी होत नाही. दुकानदार त्याच्याकडील मोठ्या सिलेंडर मधील गॅस कनेक्टरच्या सहाय्याने लहान बर्नर सिलेंडरमध्ये भरून देतो.

तसेच व्यावसायिक कारणांसाठी देखील अनेकजण अवैधरीत्या सिलेंडर घेतात. महामार्गावर हे रॅकेट जोरात सुरु असते. या काळ्या धंद्यातले मुरब्बी एकदा कारवाई झाली तरी पुन्हा त्याच मार्गाने जाऊन पुन्हा गॅस चोरीचा काळा धंदा करतात. त्यांच्यावर जरब बसवणे फार गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.