Pune : पाणी मिळण्यासाठी नगरसेवक विशाल धनवडे यांचा ठिय्या

एमपीसी न्यूज – मागील 18 दिवसांपासून प्रभाग क्रमांक 17 मध्ये पाणी येत नसल्याने शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले. पुणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांच्या कार्यालयात शिवसैनिकांसह धनवडे आंदोलनात सहभागी झाले होते.

पुणे महापालिकेतर्फे  गुरुवारी (दि. 6) जलशुद्धीकरण केंद्रांचे काम करण्यात आले होते. त्यासाठी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तेव्हापासून प्रभाग क्रमांक 17 रास्ता पेठ – रविवार पेठ, नाना पेठ, गणेश पेठ, गुरुद्वारा पेठ, कसबा पेठ, भवानी पेठ भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचे विशाल धनवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उद्यापासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित केल्याचेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.