नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा-गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत

एमपीसी न्यूज – नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन वाचेल, नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, देश आत्मनिर्भर बनून शेतकऱ्यालादेखील लाभ होईल. त्यामुळे देशात नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्याबाबतची माहिती पोहोचवावी, असे आवाहन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. 
पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्य शासनाच्या कृषि विभागातर्फे आयोजित ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, हरितक्रांतीमुळे उत्पादनात निश्चितपणे वाढ झाली. मात्र रासायनिक खतांचा उपयोग किती प्रमाणात करायचा हे न कळल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढेल आणि या समस्यातून बाहेर पडता येईल. त्यामुळे नैसर्गिक शेती व्यायसायिकदृष्टीने करून जमिनीची उत्पादनक्षमता वाढवावी आणि नैसर्गिक शेतीसाठी मार्गदर्शकांची साखळी तयार करून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे.
नैसर्गिक शेतीत सोप्या घटकांचा विचार
जंगलात सर्व वनस्पतींना आवश्यक सेंद्रीय घटक पुरेशा प्रमाणात मिळतात. हेच तत्व अनुसरून नैसर्गिक शेतीचा विचार करण्यात आला आहे. नैसर्गिक शेतीत थोडे वेगळे तंत्र वापरण्यात आले आहे. यात बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, पीकांचे आच्छादन, वाफसा पद्धत, आंतरपीक आणि बहुपीक पद्धती, वाफे तयार करणे अशा सोप्या गोष्टींचा विचार यात आहे.

शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती उपयुक्त
खतांच्या अधिक वापरामुळे शेतीवरचा खर्च वाढला आहे. शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबला जात आहे. परदेशातून हे खत आयात केले जाते. शिवाय मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने आरोग्य सुविधांवरील खर्च वाढत आहे. याचा देशाच्या आर्थिक प्रगतीवर परिणाम होत आहे. हा खर्च कमी केल्यास देशाची वेगाने प्रगती होईल. नैसर्गिक शेतीमुळे हे सहज साध्य करता येईल. माझ्या स्वत:च्या शेतात अशा प्रयोगामुळे उत्पादनात वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
रासायनिक व जैविक शेतीत समस्या अधिक
ग्लोबल वॉर्मिग, पाण्याचा अधिक वापर, जमिनीचा पोत बिघडणे, भूजलस्तर खालवणे, शेतकऱ्याचे उत्पन्न कमी होणे, मानवी आरोग्यावर दुष्परिणाम अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. अन्नसाखळीतून येणारे रासायनिक घटक मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. देशातील एकूण उपयोगात आणणारे रासायनिक खतांपैकी २५ टक्के वापर महाराष्ट्रात होत आहे. हरितक्रांतीपूर्वी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण २.५ टक्के होते, हे प्रमाण आता ०.५ टक्क्यापेक्षा कमी झाले आहे. यामुळे जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. त्यामुळे खतांचा अधिक उपयोग करूनही उत्पादन वाढत नाही.
आज जागतिक तापमानवाढीसाठी रासायनिक आणि जैविक शेती कारणीभूत आहे. जैविक शेतीत उपयोगात आणले जाणारे गांडूळ परदेशातून आलेले आहे. गहू आणि धान पिकाला एक एकरात ६० किलो नायट्रोजनची गरज आहे आणि जैविक शेतीसाठी आवश्यक शेणखताच्या एक टनामध्ये २ किलो नायट्रोजन असते. त्यामुळे गरजेची पूर्तता करताना अधिक शेणखत वापरल्यास मिथेन वायू अधिक प्रमाणात तयार होऊन वातावरणातील तापमान वाढीला मदत होईल. म्हणून नैसर्गिक शेतीला चालना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असे राज्यपाल देवव्रत म्हणाले.
महाराष्ट्र ऐतिहासिकदृष्टीने, देशाला कृषि आणि आर्थिक क्षेत्रात पुढे नेणारे राज्य आहे. राज्यातील शेतकरी प्रगतीशिल आणि मेहनती आहे. राज्यातील शेतकऱ्यांसमोर समस्या असल्याने त्यावर एकत्रितपणे विचार करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.