Pimpri: दानवे यांनी 23 निवडणुका जिंकल्या, वाघेरे यांनीच आपली उंची तपासावी – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची राजकीय कारकीर्द प्रचंड मोठी आहे. त्यांनी 23 निवडणूका जिंकल्या आहेत. सरपंच, आमदार, खासदार ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. आता राज्यातील सर्वांत मोठे पक्षाचे ते अध्यक्ष असून त्यांची उंची खूप मोठी आहे. त्यामुळे संजोग वाघेरे यांनीच आपली उंची तपासावी, अशी टीका सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केली. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची चौकशी सुरु असून त्याचआधारे त्यांच्या अटकेबाबत दानवे यांनी भाष्य केले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सिंचन घोटाळ्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जेलमध्ये जाणारच असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी (दि. 17) म्हटले होते. त्याला वाघेरे यांनी आज (शुक्रवारी) प्रतित्युत्तर देताना राज्याभरातील स्मार्ट सिटीची कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या लोकांनाच मिळत आहेत. समृध्दी महामार्गाचे काम देखील नजीकच्या लोकांना दिले आहे. यामधील गैरप्रकार आगामी काळात बाहेर येणार असून मुख्यमंत्र्यांनाच भविष्यात अटक होईल. दानवे यांनी त्यांची चिंता करावी आणि आपली राजकीय उंची बघून बोलावे, अशी टीका केला होती.

त्याला एकनाथ पवार यांनी आज (शनिवारी) प्रत्युत्तर दिले. पवार म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आजपर्यंत 23 निवडणूका जिंकल्या आहेत. सरपंच, आमदार, खासदार ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. वाघेरे केवळ महापौर आणि नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी भाजप प्रदेशाध्यांवर टीका करताना आपण कोणावर बोलत आहोत, याचे आत्मपरिक्षण करावे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापालिकेच्या कामात कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नसल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर याच वाघेरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांचे छायाचित्र पायदळी तुडविले होते. आता त्यांना पवार यांचा पुळका आला आहे, असेही एकनाथ पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.