Dehugaon : तुकोबांच्या पादुकांचे विठाई बसने पंढरीकडे प्रस्थान ; हरिनामाच्या जयघोषात देहूनगरी दुमदुमली

Tukoba's Paduka Departure to Pandhari by Vithai Bus; Dehunagari erupted in cheers of Harinama

एमपीसीन्यूज : टाळ मृदुंगाचा गजर अन ‘ज्ञानोबा तुकोबा’च्या जयघोषात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पादुका ‘विठाई’ या बसने आज, मंगळवारी दुपारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. राज्य परिवहन महामंडळाच्या या बसमध्ये निवडक 20  वारकरी भाविकांना प्रवेश देण्यात आला. विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट केलेल्या या बसने दुपारी एकच्या सुमारास विठुरायाच्या भेटीसाठी प्रस्थान ठेवले.

प्रस्थान सोहळ्यापूर्वी मंगळवारी पहाटे विठ्ठल रखुमाई मुख्य मंदिरात देहू देवस्थाचे विश्वस्त,पालखी सोहळा प्रमुख यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर परंपरेनुसार विश्वजित महाराज मोरे यांच्या हस्ते काकडा आरती व पांडुरंगाची महापूजा आणि पादुकांची महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार कीर्तन झाले. पंचपदीमध्ये पाच मानाचे अभंग घेण्यात आले.

त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी राम किशोर नवल, प्रांताधिकारी सचिन बारवकर,  तसेच राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार,  अप्पर पिंपरी चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड, मंडलाधिकारी गणेश सोमवंशी, किशोर शिंगोटे, प्रमोद भांड, तलाठी अतुल गित्ते यांनी दर्शन घेतले.

दुपारी बरोबर एक वाजता ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या गजरात पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी संत तुकोबांच्या पादुका आपल्या डोईवर घेतल्या. टाळ मृदुंगाच्या गजरात पादुका मुख्य मंदिरातून बाहेर आणण्यात आल्या.  वारकरी भाविक  मुख्य मंदिरात प्रदक्षणा घालून  टाळ मृदंगाच्या निनादात  मोठ्या भक्तीने  वैष्णव धर्माची भगवी पताका आकाशाकडे उंचावत नाचू लागले.

हरिनामाचा जयघोषात तुकोबांच्या पादुका मंदिरा बाहेर आणण्यात आल्या. मुख्य महाद्वारासमोर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे यांनी पादुका डोईवर घेऊन इनामदार वाड्यात आणल्या. त्यानंतर विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट केलेल्या विठाई बसमध्ये या पादुका ठेवण्यात आल्या. महिला भाविकांच्या हस्ते या बसची पूजा करण्यात आली.

पुंडलिक महाराज मोरे यांच्या हस्ते बससमोर श्रीफळ वाढविण्यात आला. महिला भाविकांनी बस समोर फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. इनामदार वाड्या समोर बसमध्येच संत तुकाराम महाराजांचे वंशज दिलीप महाराज मोरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

त्यानंतर संत तुकाराम महाराजांचे शिष्य अनगडशाहा बाबा दर्गा येथे आरती करण्यात आली. त्यानंतर दुपारचा विसावा म्हणजे चिंचोली येथील संत तुकाराम महाराज पादुका विसावा मंदिरात आरती झाली. चिंचोली येथून आरती घेतल्या नंतर विठाई बसने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

तुकोबांच्या पादुका पंढरपूरला जाईपर्यंत रोटी घाट आणि वाखरी येथे आरत्या होणार आहेत. मात्र, आरती होताना पादुका बसमध्येच राहणार असल्याचे देहू देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले.

दरम्यान, परंपरेनुसार नगारा, चौघडा बाळू पांडे, उमेश पांडे आणि पिराजी पांडे, तर शिंगाड वाजवून पोपट तांबे यांनी आपली सेवा तुकोबारायांना समर्पित केली.

इंदोरीच्या महिला वारकरी आशा मराठे यांच्यासह देहू देवस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख आणि अन्य निवडक वीस वारकरी भाविक तुकोबांच्या पादुकांसमवेत बसमधून पंढपूरच्या दिशेने रवाना झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.