Aalandi : माउलींच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान; इतिहासात पहिल्यांदाच पालखी सोहळा एसटीने रवाना (Video) 

Departure of Mauli's Padukans to Pandharpur; For the first time in history, the palakhi ceremony was sent by ST

0

एमपीसीन्यूज : आळंदी येथील माउली मंदिर लगत असलेल्या दर्शनबारी सभागृहात तब्बल १७ दिवसांचा पाहुणचार घेत माऊलींच्या पादुका श्रीगुरु पांडुरंगरायांच्या भेटीसाठी पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. शासन निर्देशांचे पालन करीत २० मान्यवरांसमवेत आकर्षक लक्षवेधी विविध रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने सजलेल्या एस.टी. बसने इतिहासात प्रथमच माउलींच्या पादुकांचे प्रस्थान झाले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, विश्वस्त डॉ.अभय टिळक, श्रींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरु, सेवक बाळासाहेब रणदिवे चोपदार, मारुती महाराज कुऱ्हेकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, राहुल चिताळकर पाटील, नगरसेवक आदित्य घुंडरे, संदीप रासकर, पांडुरंग वहिले, प्रशांत कु-हाडे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, डी. डी. भोसले पाटील, इन्सिडेंट अधिकारी प्रांत संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, विवेक लवांड, आळंदीचे मंडलाधिकारी चेतन चासकर, तलाठी विकास नरवडे, बी. बी.पाटील आदींसह भाविक, वारकरी उपस्थित होते.

(व्हिडिओ सौजन्य – देवदत्त कशाळीकर)

पंढरीला जाण्यास निघण्यापूर्वी मंदिरात पालखी सोहळ्याचे सकाळी साडे पाच ते साडे सहाला श्रींना अभिषेख, दुधारती करण्यात आली. सकाळी सात ते नऊ कीर्तन तसेच विश्वस्त डॉ.अभय टिळक यांचे प्रवचन झाले. दुपारी बाराच्या सुमारास श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी श्रींच्या पूजेचे पौरोहित्य यज्ञेश जोशी, राहुल जोशी, राजाभाऊ चौधरी आदींनी केले.

त्यानंतर कर्णेकरी सेवक बल्लाळेश्वर वाघमारे यांनी कर्णा वाजवीत सोहळ्यास निघण्याची वेळ जवळ आल्याचे संकेत दिले. त्यामुळे सोहळ्याचे संबंधित घटकांत लगबग सुरु झाली. आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते श्रींच्या पादुकांवर पुष्पहार अर्पण करीत सोहळा निर्विघन पणे पार पडावा यासाठी साकडे घालण्यात आले.

नगराध्यक्षा उमरगेकर यांच्या हस्ते आळंदी नगरपरिषदेच्या वतीने सोहळ्यातील मान्यवर २० वारकरी भाविक, प्रांत संजय तेली, तहसीलदार सूचित आमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव आदींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या पादुका पंढरीकडे मार्गस्थ होताना सोबत वीस मान्यवर यांना सर्व नियमांचे पालन करण्यासह सामाजिक अंतर कायम राखण्याचे सूचना देण्यात आल्या. खेडचे प्रांत संजय तेली यांनी मार्गदर्शन केले.

माउलींच्या पादुका पंढरीकडे घेऊन जाणाऱ्या बसमध्ये दिंडीकऱ्यांसह पुजारी, सेवक चोपदार, मानकरी असल्याचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले. आजोळघरातून श्रींच्या वैभवी पादुका दुपारी दीडच्या सुमारास पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने इतिहासात प्रथमच माऊलींच्या पादुका शासनाच्या नियमांचे पालन करीत दुपारी दोनच्या सुमारास आळंदी इंद्रायणी नदीचे पुलावरून पंढरीकडे रवाना झाल्या.

या बस मध्ये पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त विकास ढगे, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, उर्जितसिंह शितोळे सरकार, बाळासाहेब चोपदार, रथापुढील दिंडी क्रमांक १ मधील ऋषिकेश वासकर, संभाजी बराटे, ज्ञानेश्वर दिघे, संजय कोलन, दिंडी क्रमांक दोनमधील अविनाश भोगाडे, दिडी क्रमांक तीनमधील ऋषिकेश मोरे, रथामागे दिंडी क्रमांक एकमधील चंद्रकांत तांबेकर खडकतकर, दिंडी क्रमांक दोनचे श्रीकांत टेंभूकर, दिंडी क्रमांक तीनचे भानुदास टेंभूकर, योगीराज कु-हाडे, योगेश आरु आळंदीकर मानकरी, पुजारी,कर्णेकरी आणि शिपाई हरिनाम गजरात श्रींचे पादुकां समवेत रवाना झाले.

यावेळी एसटीचे सॅनिटायझेशन करीत पुष्प सजावट व रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या. आजोळघर परिसरात श्रींच्या सोहळ्यास मार्गस्थ करण्यास भाविक उपस्थित होते. या वारीस जाणा-या वीस वारक-यांना बसमध्ये प्रवेश देताना कोरोना टेस्ट तसेच प्रवासाआधी वारक-यांना फेस शिल्ड मास्क देण्यात आले.

पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई पादुकांसोबत होते. माऊलींच्या पादुका पंढरीत पोचवून पुन्हा आळंदीला आणण्याची मोठी जबाबदारी प्रांत संजय तेली यांच्याकडे आहे. यानिमित्त आळंदी मंदिरासह आजोळघर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची आषाढी वारी रद्द झाली आहे. यामुळे आळंदीतही परिसरातून भाविक येऊ नये यासाठी आळंदी पोलिसांनी काळजी घेत परिसरात प्रवेशावर मर्यादा आणल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like