Dehuroad Crime : प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; सहा महिन्यांच्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यास आरोपीचा नकार

एमपीसी न्यूज – विवाह झालेला असताना त्याने एका तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेवले. त्यातून त्यांना एक मुलगी देखील झाली. त्यानंतर त्या व्यक्तीने संबंधित तरुणीसोबत विवाह करण्यास तसेच त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. यातूनच त्याने तरुणीचा खून केला. ही घटना आज (रविवारी, दि. 27) सकाळी देहूरोड येथे उघडकीस आली.

प्रिया शीलवंत चव्हाण (वय, 20 वर्ष,रा. आदर्शनगर, किवळे, देहूरोड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रशांत गायकवाड (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत आणि प्रिया यांचे मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रशांत याचा विवाह झालेला आहे. त्याला दोन मुले आहेत. तरीही त्याने प्रियाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यातूनच त्यांना एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर प्रशांत याने प्रियासोबत विवाह करण्यास तसेच मुलीच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. त्यावरून प्रिया आणि प्रशांत यांच्यात वारंवार भांडण होत होते.

आरोपी प्रशांत याच्यावर सन 2016 मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. शनिवारी (दि. 26) रात्री दोन वाजता प्रशांत याने प्रिया सोबत भांडण काढून तिला जबरदस्तीने घरातून नेले. त्यानंतर त्याने तिचा खून केला आणि प्रशांत पळून गेला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी प्रशांतला ताब्यात घेतले आहे.

प्रिया सोबत भांडण करून तिला घरातून नेल्यावर प्रियाची बहीण रेश्मा चव्हाण (वय 24) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. त्याच गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना प्रियाचा खून झाल्याची माहिती मिळाली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.