Dehuroad : ‘त्या’ सहा ‘कोरोना’ संशयितांचे नमुने निगेटिव्ह; सहा जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – देहूरोड येथील एकाच परिवारातील सहा जणांना कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या चाचणी अहवालात कोरोनाचे विषाणू आढळले नसल्याचे समोर आले आहे. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वैद्यकीय विभागाने याबाबत माहिती दिली.

चीनमध्ये हडकंप माजविलेल्या कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. पुण्यात पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने संशयित रुग्ण आढळल्यास तत्काळ नायडू रुग्णालयात दाखल करावे अशा सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, आज, (बुधवारी) देहूरोड येथील सहा जणांना कोरोना संशयित म्हणून खबरदारीसाठी पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासण्यात आले आहेत.

देहूरोड येथील संबंधित कुटुंब 27 फेब्रुवारीला दुबईवरुन परत आले होते. स्थानिक डॉक्टरांनी त्यांचे नमुने तपासल्यानंतर त्यांच्यवर संशय बळावल्याने त्यांना तात्काळ पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे नमुने तपासल्यानंतर तपासणी अहवालात कोरोनाचे कोणतेही विषाणू नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी विनाकारण एकत्र येणे टाळावे. सामाजिक शिष्टाचार पाळताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.