Dehuroad News : संप विरोधी कायद्याच्या निषेधार्थ ऑर्डनन्स फॅक्टरी कामगारांचा मोर्चा

एमपीसीन्यूज : ऑर्डनन्स फॅक्टरीचे व्यावसायिकीकरण करण्याच्या विरोधात देशभरातील कामगारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या विरोधात आज ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड संयुक्त समितीच्या वतीने फॅक्टरी व्यवस्थापनाला संपाची नोटीस देण्यात येणार होती. मात्र, व्यवस्थापनाने आंदोलन दडपण्यासाठी संप विरोधी अत्यावश्यक रक्षा सेवा कायदा लागू केला. या कायद्याविरोधात समितीच्या वतीने आज, गुरुवारी काळा दिवस पाळण्यात आला.

अत्यावश्यक रक्षा सेवा कायदा आंदोलन करणाऱ्या कामगारांसाठी अन्यायकारक आहे. हा कायदा लागू केल्याने संप केल्यास आंदोलक कामगारांना एक वर्ष अटक आणि दहा हजार रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या कायद्यविरोधात कामगारांनी फॅक्टरीच्या प्रवेशद्वारावर सकाळी सात वाजता सरकाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर काळी पट्टी बांधून कर्मचारी कामावर हजर झाले.

पुन्हा दुपारी चार वाजता फॅक्टरीचे मुख्य प्रवेशद्वार ते पुणे -मुंबई महामार्गापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यात बहुसंख्येने कामगार उपस्थित सहभागी झाले होते. भविष्यातही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू ठेवले जाईल, असा इशारा संयुक्त समितीने दिला आहे.

या आंदोलनात समितीचे गजानन काळे, दिलीप भोंडवे, मोहन घुले, अशोक थोरात, मिलिंद भालेराव, सिध्दांर्त गायकवाड, निसार शेख, धीरज लोहार, रमेश रमन, महेश पांचपांडे, उमेश मानकर यांच्यासह कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याची माहिती समितीचे प्रसिद्धीप्रमुख अशोक थोरात यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.