Dehuroad News : कॅंटोन्मेंट बोर्डाची तत्परता; मामुर्डीतील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य जलवाहिनीतून मामुर्डी येथे पाणी गळती होत असल्याने मोठयाप्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्त्याने कॅंटोन्मेंट प्रशासनाकडे केली होती. त्याची तात्काळ दखल घेत कॅंटोन्मेंट बोर्डाच्यावतीने आज ( गुरुवारी ) सकाळपासून या जलवाहिनीची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मामुर्डी येथील मुख्य रस्त्यालगत मीना बिल्डींग समोर देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य जलवाहिनीतून अनेक दिवसांपासून पाणी गळती सुरु होती.

ज्या ठिकाणी ही गळती सुरु होती तेथे महावितरणचा ट्रान्स्फार्मर आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकऱ्यांकडे केलेल्या लेखी तक्रारीत व्यक्त केली होती.

तसेच पाणीगळतीमुळे परिसरात निर्माण झालेली दलदल आणि घाणीचे साम्राज्य याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. तसेच या पाणीगळतीबाबत स्थानिक जागरूक नागरिक विशाल भोसले यांनी कॅंटोन्मेंट प्रशासनाला अनेकदा माहिती दिली होती. तसेच याबाबत ‘एमपीसीन्यूज’ने काल, बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते.

या तक्रारीची दाखल घेत जलवाहिनी दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी हाती घेणार असल्याचे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी काल, बुधवारी सांगितले होते. बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनीही तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते.  त्यानुसार आज गुरुवारी या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

‘एमपीसी न्यूज’चे विशेष आभार !

दरम्यान, जनहिताच्या प्रश्नाची तातडीने दखल घेत तातडीने कार्यवाही सुरु केल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल भोसले यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांचे आभार मानले. त्याचबरोबर या प्रश्नाला वाचा फोडल्याबाबत ‘एमपीसी न्यूज’चेही त्यांनी विशेष आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.