Dehuroad News :किवळे-रावेत परिसरातील वीज समस्या सोडवा; अन्यथा आंदोलन : राष्ट्रवादीचा इशारा

एमपीसीन्यूज : किवळे-रावेत परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असून याबाबत केलेल्या तक्रारींकडे डोळेझाक केली जात आहे. या पुढेही ही समस्या कायम राहिल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनी दिला आहे.

या संदर्भात माजी नगरसेवक खानोलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणच्या निगडी-प्राधिकरणातील कार्यालयात उप कार्यकारी अभियंता चौधरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष अर्चना राऊत, विकासनगर युवती अध्यक्ष पुजा मुर्गेश, अभिषेक लोंढे, सचिन काळे, फारूक मुलाणी आदी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून रावेत, किवळे, साईनगर, मामुर्डी, विकासनगर, बापदेवनगर, दत्तनगर, आदर्शनगर या भागात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. सध्या कोरोना महामारीमुळे व लॉकडाऊनमुळे अनेक कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे काम करीत आहेत. वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वारंवार फोनद्वारे तक्रार करून निवेदन देऊनही तक्रारीचे निवारण होत नाही. किवळे-रावेत परिसरातील वीज समस्येचे निवारण झाले नाही तर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा खानोलकर यांनी दिला.

दरम्यान, येत्या 3  ते 4  दिवसांत वीज समस्या सोडविण्याचे आश्वासन उप कार्यकारी अभियंता चौधरी यांनी दिल्याची माहिती खानोलकर यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.