Dehuroad News : कॅंटोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षाच्या मुलाला पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहाण; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा धमकी

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे शिवसेना नगरसेवक व माजी उपाध्यक्ष कै. मिलिंद रोकडे यांचा मुलगा घराजवळ मित्रासोबत बोलत उभा असताना गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्याने काहीही कारण नसताना त्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. याबाबत  थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.

गुरुवारी ( दि. १९) पहाटे देहूरोड येथे मिलिंद हाईट इमारतीजवळ हा प्रकार घडला. रोहित मिलींद रोकडे, असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे तक्रार केली आहे.

रोहित हा गुरुवारी पहाटे पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या आपल्या ‘मिलींद हाईट’ या घराजवळ मित्रासोबत बोलत थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून तेथे भोसले नावाच्या पोलीस कर्मचाऱ्यासह गायकवाड नावाचा झिरो पोलीस आला.

भोसले यांनी रोहितला ‘इथे का थांबला’, असे विचारत ताबडतोब घरात जाण्यास सांगितले. तसेच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘साहेब जातोय घरात कशाला शिव्या देता. विनाकारण शिव्या देऊ नका’, अशी विनंती रोहित याने त्यांना केली.

त्यावर चिडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने रोहितला मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘गाड्या जाळता काय’, असे म्हणत ‘ गाड्या जाळल्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकीन, अशी धमकी दिली.

याबाबत रोहित याने देहूरोड पोलीस ठाण्यात जाणून तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता तिथेही त्याला वाईट अनुभव आला. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनीही त्याला दमदाटी करुन हुसकावून लावले. त्यामुळे त्याने थेट पोलीस आयुक्तांना ई मेल करून आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार दिली.

तसेच लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पोलिसांनी केलेल्या शिवीगाळ आणि मारहाणीची माहिती देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी करणार असल्याचे रोहित याने सांगितले.

दरम्यान,  देहूरोड शहरातील प्रमुख चौकांमध्ये अनेक तरुण रात्री उशिरापर्यंत विनाकारण थांबलेले असतात. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस एखाद्या निरपराध मुलावर दंडुका उगारत स्वतःची पाठ थोपटून घेतात तेव्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला नुकतेच निलंबित केले आहे. त्यामुळे आता रोहितच्या तक्रारीची दखल घेऊन त्याला विनाकारण मारहाण करणाऱ्या आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा धमकी देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांचे रक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. नेमका काय प्रकार घडला याची माहिती तक्रारदार आणि संबंधित पोलीस कर्मचारी यांच्याकडून घेतली जाईल. त्यानंतर दोषी आढळल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निश्चित कारवाई केली जाईल. विलास सोंडे- वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देहूरोड पोलीस ठाणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.