Dehuroad : पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादामुळे अवघ्या काही मिनिटात दोन भामटे जेरबंद

एमपीसी न्यूज- तक्रार मिळताच तात्काळ प्रतिसादासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाने दोन भामट्यांना जेरबंद केले. सोन्याच्या दागिन्यांना पॉलीश करण्याच्या बहाण्याने घरात शिरून या भामट्यानी सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. ही घटना शुक्रवारी (दि. 12) देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शितळानगर येथे घडली.

रणजित गेंदालाल साह (वय 40) आणि अभिनंदन उर्फ नंदकुमार दशरथ साह (वय 23 रा. दोघेही रा. भागलपूर, बिहार ) अशी या प्रकरणी अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत.

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त आर के पदमनाभन यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये तात्काळ प्रतिसादासाठी एक पथक तैनात करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी शितळानगर नं १ मध्ये दोन व्यक्ती सोन्याच्या दागिन्यांना पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने एका घरात शिरले. घरातील महिलेने सोन्याची अंगठी आणि चेन पॉलीश करण्यासाठी त्यांच्याकडे दिली असता महिलेची फसवणूक करून ते दागिने घेऊन घरातून पळून गेले. असल्याची तक्रार सदर महिलेने केली. चोरटे देहूरोड बाह्यवळण मार्गाने कात्रजच्या दिशेने गेले असल्याची माहिती या महिलेने पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच देहुरोड पोलीस ठाण्यातील तात्काळ प्रतिसादासाठी नेमण्यात आलेल्या पथकाने काही मिनिटातच दोन्ही भामट्याना जेरबंद करून अटक केली. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक मनोज पवार, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सुभाष सावंत, पोलीस नाईक प्रमोद उगले, पोलीस हवालदार गडाळे, बगाड, पोलीस शिपाई पुंडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.