Dehuroad : फ्री बूट मिळवण्यासाठी गमावले 61 हजार रुपये

जवानाची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज – एक बुटाचा जोड खरेदी केल्यानंतर दुसरा जोड फ्री मिळणार. अशी ऑफर देऊन ऑर्डनन्स डेपोमध्ये काम करणा-या जवानाची 61 हजार 330 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार देहूरोड येथे 8 जानेवारी रोजी घडला असून याबाबत 24 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजय कुमार झा (वय 34, रा. सेंट्रल ऑर्डनरी डेपो, देहुरोड. मूळ रा. भेजा, ता. झंझारपुर, जि. मधुबनी, बिहार) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 8101757306 या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झा यांनी 29 डिसेंबर रोजी लम्ब्रोड या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून बुटाचा जोड खरेदी केला. त्यावर एक जोड खरेदी केल्यास दुसरा बुटाचा जोड फ्री मिळणार असल्याची ऑफर सुरु होती. 7 जानेवारी रोजी त्यांनी केलेल्या ऑर्डरमधील एक जोड त्यांना मिळाला. मात्र, फ्री असलेला दुसरा जोड मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी लम्ब्रोड कंपनीच्या संकेतस्थळावरून कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक (06296444047) घेतला. त्यावर संपर्क केला असता त्यांना सांगण्यात आले की, फ्री बूट मिळवण्यासाठी तुम्हाला अगोदर युपीआयद्वारे दहा रुपये भरावे लागतील.

8 जानेवारी रोजी सकाळी फिर्यादी यांना 8101757306 या क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने लम्ब्रोड कंपनीतून बोलत असल्याचे सांगत ‘तुम्ही बुक केलेल्या ऑर्डरमधील फ्री बुट हवा असेल तर युपीआयदवारे 10 रूपये ट्रान्सफर करा’ असे सांगितले. फोनवरील व्यक्तीने झा यांना एक लिंक पाठवली. ती लिंक उघडून झा यांनी मागितलेली माहिती भरली. त्यानंतर झा यांच्या एका बँकेच्या खात्यावरून 9 हजार 230 रुपये, काही वेळाने 40 हजार रुपये डेबीट झाल्याचा मेसेज आला. दुस-या बँकेच्या खात्यावरून 12 हजार 100 रुपये डेबीट झाल्याचा मेसेज आला. फोनवरील व्यक्तीला याबाबत सांगितले असता त्याने फोन कट केला.

त्यानंतर झा यांनी त्या व्यक्तीला फोन केला असता त्याने फोन कट केला. झा यांनी तात्काळ पिंपरी-चिंचवड सायबर सेलमध्ये तक्रार केली. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दोन बँक खात्यावरून एकूण 61 हजार 330 रुपये काढून त्यांची फसवणूक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.