Wakad : व्यापा-यांच्या अडचणीत पोलीस त्यांच्या कायम सोबत – पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचा मेळावा

एमपीसी न्यूज – व्यापा-यांच्या सामूहिक तसेच व्यक्तिगत समस्या व अडचणी सोडविण्यास पोलीस तत्पर आहेत. व्यापारी आणि पोलीस यांचा समन्वय समाजाच्या हिताचा आहे. व्यापा-यांच्या अडचणीत पोलीस त्यांच्या कायम सोबत असल्याचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ व्यापाऱ्यांवरील हल्ल्यांचे प्रकार वाढल्याने पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे व्यापाऱ्यांची एकजूट करण्यासाठी व्यापारी मेळाव्याचे राहटणी येथे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त ढाकणे बोलत होते. या मेळाव्याला संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, नगरसेवक कैलास थोपटे, संभाजी बारणे, सुनील गेहलोत, विजय नरेला, अजित चंगेडीया, निलेश ठाकरे, प्रकाश भंडारी, संतोष चौधरी, सुधीर अग्रवाल, गरजमल, मिलिंद साळवी आदी उपस्थित होते.
यावेळी व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यावरील उपाय तसेच प्रत्येक व्यापा-यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, अन्न व औषध प्रशासनाचा परवान्यासाठी सामूहिक मेळाव्याचे आयोजन करणे, वजन काटा निरीक्षकांच्या मार्गदर्शन मेळाव्याचे, संकट काळात सर्वांनी एकत्र येणे आणि एकमेकांस साथ देणे आदी प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
व्यापाऱ्यांना संकटात सदैव मदत करणारे हिम्मत भाटी, केसाराम परिहार, भुराराम भाटी, रमेश गेहलोत, सुरेश चौधरी, काणाराम चौधरी, भगाराम चौधरी, लक्ष्मण परमार, पारस भाटी, चुननीलाल चौधरी, घीसाराम चौधरी, शंकर गेहलोत, गणेश चौधरी, महेंद्र राठोड आदी व्यापाऱ्यांचा उपायुक्त ढाकणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी व्यापाऱ्यांशी समन्वय साधून सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या हद्दीतील महत्वाच्या चौकात 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आणखीही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. पोलिसांना अशा प्रकारे सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
उपायुक्त ढाकणे म्हणाले, आजच्या युगातील सीसीटिव्ही कॅमेरा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे. व्यापा-यांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. यामुळे अनेक गोष्टींना आळा बसतो. गुन्हेगारी घटना घडल्यास सीसीटीव्ही कॅमे-यांची पोलिसांना मोठी मदत होते. तसेच आपल्या सुरक्षेसाठी देखील सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत आवश्यक आहेत.
सचिन निवंगुणे म्हणाले, “वाढत्या गुन्हेगारी बरोबरच व्यापा-यांवरील हल्ले देखील दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेत असलेल्या व्यापा-यांनी केवळ एकजूट वाढविण्याची गरज आहे.”
पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले, “सीसीटीव्ही म्हणजे आपले सुरक्षाकवच आहे. या सीसीटीव्ही कॅमे-यांमुळे अनेक अशक्य गुन्हे उघड करण्यास पोलिसांना मदत झाली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.