Pimpri: नगररचना विभागातील अधिका-यांची उडवाउडवीची उत्तरे; नगरसेवक डोळस यांनी अधिका-यांना घेतले फैलावर

नगररचना विभागातील अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आयुक्तांचे आदेश 

एमपीसी न्यूज – दिघीतील जागा हस्तांतरणाबाबत नगरसेवक पाठपुरावा करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी देखील सकारात्मक प्रतिसाद देत असताना पालिकेतील नगररचना विभागाचे अधिकारी जाणीवपुर्वक कामे मार्गी लावण्यास विलंब करत असल्याचा आरोप करत स्थायी समितीचे सदस्य विकास डोळस यांनी नगररचना विभागाच्या अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच जनतेच्या कामास विलंब केल्यास तुमची गय केली जाणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला. त्यानंतर नगररचना विभागातील अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे  आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (मंगळवारी) पार पडली. दिघी येथील सर्व्हे नंबर 64 येथील गायरान जमीन जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिकेकडे हस्तांतरित करण्यास फेब्रुवारी महिन्यात मान्यता दिली आहे. पालिकेने ‘चलन’ भरल्यानंतर ती जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली जाणार होती. त्याबाबत स्थानिक नगरसेवक विकास डोळस वारंवार पाठपुरावा करत होते. परंतु, सहा महिने होऊन देखील पालिकेने ‘चलन’ भरले नव्हते. त्याबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. दोन दिवसांपूर्वी पालिकेने चलन भरले आहे.

यावरुन मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक डोळस यांनी नगररचना विभागाच्या अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले. जागा हस्तांतरण करुन घेण्याचे काम नगररचना विभागाचे आहे. परंतु, ते काम आम्हाला करावा लागत आहे. आम्ही नगरसेवक त्याबाबत पाठपुरावा करत असताना आम्हाला देखील उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. दिघीतील गायरानाच्या जागेबाबत मी गेल्या सात महिन्यांपासून पाठपुरावा करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सकारात्मक प्रतिसाद देत असताना पालिकेतील अधिकारी जाणीवपुर्वक विलंब करत आहेत. केवळ चलन भरण्यास पालिकेने सहा महिने घेतले आहेत.

नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर हे सभेत चुकीची माहिती देऊ लागले. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ठाकूर यांना माहिती घेऊन सांगण्याचे निर्देश दिले. तसेच नगररचना विभागाच्या अधिका-यांना कारणे दाखवा नोटीसा बजाविण्याचे आदेश दिले आहेत. अधिका-यांनी जनतेची कामे करावीत. त्याला विलंब करु नये, अन्यथा अशा अधिका-यांना घरी बसविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही नगरसेवक डोळस यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.