Dighi : स्वेटर देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे दिड तोळ्यांचे मंगळसूत्र लुबाडले

एमपीसी न्यूज – ‘शेठ’ला मुलगा झाला आहे. त्या आनंदात शेट स्वेटर वाटप करीत आहेत, अशी बतावणी करून वृद्ध महिलेचे सुमारे दीड तोळ्याचे मंगळसूत्र एका भामट्याने लुबाडले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 31) दुपारी बाराच्या सुमारास ममता चौक दिघी येथे घडली.

इंदिरा भिमराव गायकवाड (वय 74, रा. पंचशिल बुद्धविहारमागे, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंदिरा ममता चौक दिघी येथील पूजा साडी सेंटर जवळून पायी जात असताना तिथे एक अनोळखी इसम आला. तो म्हणाला की, ‘आमच्या शेठला 18 वर्षांनी मुलगा झाला आहे. त्यामुळे ते स्वेटरचे वाटप करीत आहेत. तुम्ही पण चला. पण, त्याआधी तुमच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र कापडी पिशवीत टाका.’ महिलेने गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र एका पाकिटात ठेऊन ते पिशवीत टाकले. आरोपीने ते पाकीट पिशवीत खाली ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखीने ते काढून घेतले.

महिलेला त्यांची फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याचा पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.