Digital Payments : डिजिटल पेमेंट… काही नागरिकांचे अनुभव … विचार करा…

एमपीसी न्यूज – सध्याच्या या यंत्र युगामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ( Digital Payments ) अधिकाधिक कागद विरहित गोष्टी करण्याची गरज आहे. कागदामुळे वृक्षतोड होत असल्याने ती थांबवायची असेल तर आपल्याला कागदविरहित जीवनशैली आत्मसात केली पाहिजे.

कागदविरहित जीवनशैली आत्मसात करायची म्हणजे, त्यात पैसे हा भाग ही आलाच की, मोबाईल मधून बँकेच्या माध्यमातून संगणकाची मदत घेत आपण आपले खर्च भागवायचे, ही खरेतर खूप भारी गोष्ट आहे.

आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे नेहमीच डिजिटल पेमेंट करण्यासाठी आग्रही राहिले आहेत आणि ही गोष्ट देशहितासाठीच आहे.  काही प्रमाणात पंतप्रधानांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसादही आपल्या देशातील लोकांनी दिला आहे.

पण, मार्केटमध्ये जरा नजर टाकली तर आता या बाबतीत थोडासा उत्साह कमी होताना दिसतोय. काही नकारात्मक लोकांच्या बोलण्याला सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला जातोय की काय, असे चित्र दिसत आहे. उदारणार्थ: आजकाल आपल्या पुण्यातील अनेक रिक्षावाले आता डिजिटल पेमेंटला फार प्रोत्साहन देताना दिसत नाही.

काही विशिष्ट अनुभव आल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे अनेक रिक्षावाले सांगतात. एका रिक्षावाल्याने मला जो अनुभव सांगितला तो ऐकून तर मी हादरूनच गेलो. त्या रिक्षावाल्याच्या रिक्षात काही महाविद्यालयीन मुली बसल्या होत्या. त्यांनी डिजिटल वरून पेमेंट केले, पण ते पेमेंट सारखे अयशस्वी होत होते. त्या मुलीनी नंतर मोबाईल वरून पाठवण्याचे सांगितले.

त्या खूप घाईत असल्याने त्या रिक्षावाल्याने त्यांचा फक्त नंबर घेऊन त्यांना तसेच जाऊ दिले. पण नंतर त्या मुलींनी त्या रिक्षा वाल्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. अनेकदा फोन करूनही ते फोन उचललेच जात नाही. रिक्षावाला पार वैतागला. नंतर ( Digital Payments ) त्या रिक्षावाल्याने कोडच काढून टाकला.

Pimpri : बोलण्यास नकार दिला म्हणून पिस्टल रोखून तरुणाला जीवे मारण्याची धमकी

तीच गत आमच्या इथल्या चहावाल्या काकांची, त्यांच्या इथे एक जोडपे रोज एका ठराविक वेळी येऊन नाश्ता आणि चहा पिऊन जायचे. रोज डिजिटल पेमेंट करायचे, सलग आठ दिवस त्यांनी असे केले. चहावाल्यांना तसे सारखेच होते म्हणा, इतर लोक करतात त्याप्रमाणे हे ही करतात. म्हणून त्यांनी काही लक्ष दिले नाही. पण नंतर एका बँकेच्या मेसेजने ते हादरले. ते जोडपे कायम पेमेंट केल्यावर, तिथून बाहेर पडल्यावर बँकेला पेमेंट करणारे ते नाहीत असे कळवायचे, जेणेकरून केलेले पेमेंट हे परत त्यांच्या खात्यात जमा होईल.

याने ते जोडपे रोज आठ दिवस सकाळ संध्याकाळ चहा नाश्ता फुकटच करून गेले होते. बर त्यांची वेळही निश्चित नसायची, शिवाय ते गर्दी असतानाच यायचे. त्यामुळे काकांना त्यांना पकडणे मुश्कील झाले होते. त्या मेसेजमध्ये याचीच नोंद केलेली होती अन नोटीस ही पाठवली होती. आता ते काका डिजिटल पेमेंट पद्धत रद्द करून रोखीचा व्यवहारच फक्त स्वीकारायचा विचार करत आहे.

त्यांच्या झालेल्या नुकसानामुळे ते हा विचार करायला उद्युक्त झाले आहेत. ते जोडपे आता आमच्या भागात दिसतही नाही. ते कुठे गेले माहित नाही. असे नुकसान ( Digital Payments ) कुणाचेही होता कामा नये, जे त्या रिक्षावाल्यांचे झाले किंवा आमच्या चहावाल्या काकांचे झाले. दोघेही खूप मेहेनतीने दोन रुपये कमावतात, ते असे परत जायला नको. यासाठी काहीतरी संबंधित यंत्रणांनी मुलभूत उपाययोजना करायला हवी.

नाहीतर हळूहळू या अशा प्रकाराने डिजिटल पेमेंट कुणीच स्वीकारणार नाही आणि ही  पर्यावरण पूरक योजनाच मातीमोल होईल. एक सक्षम यंत्रणा या अशा गुन्ह्यांना लगाम घालण्यासाठी असलीच पाहिजे. दुसरे म्हणजे आपण ज्या फोनवरून ही पेमेंटस  करतो, तो फोनही सुरक्षित असलाच पाहिजे. जरी फोन कुणी हॅक केला तरी त्यातले आर्थिक बँकांचे व्यवहार हे पूर्णपणे सुरक्षित असले पाहिजेत. तर काहीतरी अर्थ आहे.

संबंधित यंत्रणा आणि सरकार ,काहीतरी करा हो, नाहीतर जुनी रोख व्यवहाराची पद्धतच बरी होती , हेच म्हणण्याची ( Digital Payments ) वेळ येईल .

लेखक : हर्षल विनोद आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.