Pune : आमच्या पिढीचे सदारंग… पंडित शंकरराव अभ्यंकर! – पंडित विनोदभूषण आल्पे

एमपीसी न्यूज – गाण्याचे विलक्षण वेड असलेल्या एका मनस्वी शिक्षकाला मुलगा झाला. हा आनंद साजरा करण्याआधी त्या व्यक्तीने अत्यंत काळजीने एक खुळखुळा हातात घेतला आणि तो त्या मुलाच्या कानाजवळ वाजवला. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे अशा पद्धतीने त्यांनी तो वाजवून पाहिला. दरम्यान त्यांना लक्षात आले,  ज्या अर्थी मुलगा आवाजाच्या अनुरोधाने बुबुळे फिरवत आहे  त्या अर्थी त्याला व्यवस्थित ऐकू येत आहे. मग मात्र त्यांना हा आनंद गगनात मावेनासा झाला. 

असे करण्यामागचे कारण म्हणजे त्यांची पत्नी पुर्णपणे कर्णबधीर होती. त्यामुळे अनुवंशिकता म्हणून आपले बाळ कर्णबधीर तर होणार नाही ना, अशी त्यांना सारखी चिंता भेडसावत होती. पण तसे काहीच घडले नाही, मुलगा पुर्णपणे ठीक असल्याचे त्यांना लक्षात आले. केवळ इतकंच नव्हे तर मुलगा थोडा मोठा झाल्यावर त्याला संगीताची आवड असल्याचे लक्षात आले. त्यामुळे भारावलेल्या या शिक्षकाची ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ अशी अवस्था झाली.

खरंतर, स्वतः संगीताची आवड असलेल्या या शिक्षकाला आपल्या मुलाने पारंपारिक शिक्षण घेऊन मोठं होण्याऐवजी खूप मोठा गायक किंवा संगीतकार म्हणून नाव कमवावं असे वाटत होते. त्यांनी काय केले असेल ? ते त्या मुलाला घेऊन भारतातील एक थोर गवई उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्याकडे घेऊन गेले.  त्यावेळी त्या मुलाचे वय असेल चार साडेचार वर्षांचे!

एवढ्या छोट्या मुलाला पाहून खाँ साहेबांनी त्याला शिकवण्याविषयी असमर्थता दर्शवली, त्यामुळे त्यांची बरीच निराशा झाली. परंतु, सुदैवाने दांडेकर नावाचे एक गृहस्थ सातार्‍यामध्ये लहान मुलांना शिकवत. त्यांच्याकडे या अवघ्या चाप वर्षांच्या चिमुकल्याच्या प्राथमिक शिक्षणाची सोय झाली. संगीताच्या व्यासंगाचे बाळकडू असणाऱ्या या मुलाला त्यांनी काही वर्षांनी पंडित गजाननराव जोशी यांच्याकडे शिकण्यास पाठविले. त्यानंतर मात्र गुरुकुल पद्धतीच्या पारंपारिक पद्धतीने शिकण्यासाठी गुरुगृही राहून विद्यार्जन करण्यासाठी त्यावेळचे नामांकित गायक पंडित नारायणराव व्यास यांच्याकडे संगीताच्या पुढच्या शिक्षणाची सोय झाली, अशा रीतीने शिक्षणाची सुरुवात झालेल्या अलौकिक विद्यार्थ्याचे नाव म्हणजे आजचे विख्यात सतारिये, गायक आणि बंदिशकार पंडित शंकरराव अभ्यंकर !

वास्तविक त्यांचा माझा प्रत्यक्ष परिचय होण्याआधीच्या काळात मी त्यांना शास्त्रीय संगीतांच्या मैफिलींमध्ये श्रोत्यांत अनेकदा पाहत असे. विशेषत: झब्याची बटणे उजवीकडे असलेले बंगाली पद्धतीचे झब्बे ते घालत. त्यांची ती मूर्ती आज ही माझ्या डोळ्यासमोर आहे. कित्येकदा कलाकाराला दाद देताना आमची नजरानजर ही होत असे, पण परिचय नव्हता. पुढे ते सतार वादक असल्याचे कळले, पण ऐकण्याचा योग आला नव्हता.

त्यानंतर मध्यंतरीच्या काळात मुंबई विश्व विद्यालयाच्या संगीत शाखेत शिकत असताना पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडे शिकण्यासाठी मला शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या काळात संगीत केंद्राचे प्रमुख असलेले डॉक्टर अशोक रानडे हे विद्यार्थ्यांना ऐकवण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम भारतभरच्या कलाकारांना बोलावून करत असत. त्यात प्रत्यक्ष बंदिशकारांकडून बंदिशी विद्यार्थ्यांना ऐकवण्याचा एक उपक्रम त्यांनी केला. त्यात पंडित सी आर व्यास , पंडित के जी गिंडे यांच्यासारख्यांबरोबर शंकर अभ्यंकर यांचा ही समावेश होता.

तिथे मी त्यांना प्रथम स्वतःच्या बंदिशी पेश करताना ऐकले आणि एवढा भारावलो की त्यांचे गायन संपल्यावर डोळ्यात अश्रु असलेल्या अवस्थेत कोणताही संकोच न करता जाऊन त्यांच्या पाया पडलो. ते चकितच झाले आणि मग मी त्यांना वरचेवर भेटू लागलो. इतकेच नाही तर माझ्या एका कार्यक्रमाला त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याइतका मी धीट झालो होतो.

त्याच काळात पंडित कुमार गंधर्वांच्या कार्यक्रमात त्यांची तानपुर्‍यावर साथ करण्याचा योग मला आला आणि नंतरची सुमारे दहा वर्षे तो येतच राहिला. अशा तर्‍हेने या दोन बंदिशकारांच्या सहवासाचा परिणाम म्हणजे मला ही अचानक एक बंदिश स्फुरली आणि तो नादच लागला. परंतु, माझ्याबाबतीत असा योग सटी साहमाशी येत असला तरी शंकररावांच्या सृजनशिलतेशी त्याची बरोबरी कधीच होऊ शकणार नाही. इतक्या वैपुल्याने त्यांची निर्मिती ही होत असते. प्रत्येक भेटीमध्ये एखादी नवी बंदिश किंवा तराणा ते ऐकवत असत, जो उपक्रम आज ही सुरू आहे .

या सर्व निर्मितीचे मोठे यश हे की त्यांना त्यासाठी पंडित कुमार गंधर्व , पंडित रविशंकर , पंडित सी आर व्यास इतकेच काय, पण संगीतकार नौशाद इत्यादींसारख्यांचे प्रचंड कौतुक मिळाले . पंडित कुमार गंधर्वांनी तर त्यांना देवासच्या आपल्या घरी बोलावून त्यांच्या बंदिशींचा कार्यक्रम आपल्या इंदोर देवास परिसरातील पंधरा वीस कलाकारांना ऐकवला नि त्यांच्या बंदिशींची वैशिष्ठ्ये स्वतः श्रोत्यांना समजावून सांगितली . तो कार्यक्रम चांगलाच रंगला, इतका की कुमारजींनी त्यांना आतल्या खोलीत नेऊन एका अतिशय मौल्यवान सेंट ची बाटली नव्याने उघडून त्यातले सेंट शंकररावांच्या झब्यावर शिंपडले  आणि म्हणाले “ हे साधे सेंट नाही बर का ! लता मंगेशकरने मला हे दिलं होत, ते प्रथमच तुला लावले!” खर्‍याखुर्‍या कलाकारासाठी याच्या पेक्षा मोठे यश ते काय असणार ? नंतरच्या काळात शंकररावांच्या बंदिशींच्या पुस्तकाचे प्रकाशनही कुमारजींच्या हस्तेच झाले .

जी गोष्ट कुमारजींची, तीच पंडित रवीशंकरांची! शंकररावानी आपल्या बंदिशींचे पुस्तक रविशंकरजींना भेट दिले. त्यातल्या बंदिशी पाहून रवीशंकरजी ही खुश झाले. विशेषतः रवीशंकरांच्या वादनातील गुणवैशिष्ट्यांवर त्यांनी रचलेली देसी रागातील बंदिश ऐकून तर ते थक्कच झाले. तिचे शब्द असे की

“ तोपे मारू तनमन आज जो सुनायो

  नैन भर आयो

  लय सुर मेल अजब सुनायों

 सुध राग सुन मेरे नैन भर आयो”

ही बंदिश ऐकून तर त्यांनी स्वतःच्या शेजारी बसवून शंकररावांचा एक फोटो ही आपल्याबरोबर काढून घेतला .

एवढ्या थोर कलाकारांनी उत्कट दाद द्यावी असे त्यांच्या बंदिशींमध्ये आहे तरी काय , असे कुणाला वाटेल , तर ते म्हणजे स्वतः शंकरराव हे गायक आणि सतारवादक हे दोन्ही असल्यामुळे त्यांच्या बंदिशींमध्ये स्वरलय हातात हात घालून नादमय नि अर्थपूर्ण सांगेतीक शब्दांच्या माध्यमातून राग उभा करतात. त्यामुळे नुसती बंदिश जरी सादर केली तरी मैफिलीतून रसिकांची दाद येतेच येते.

गाणारा गायक जर प्रतिभावान असेल तर त्याला स्वरलयीच्या अनेक उपजा सुचू लागतात आणि सोन्याला सुगंध प्राप्त झाल्यासारखे वाटते . त्यांच्या बंदिशींचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे त्यातून रागाचे आणखी एक वेगळे रूप उभे राहाते. उदाहरणार्थ त्यांनी आपल्या अगोदरच्या आणि समकालीन सर्व बंदिशकाराना वंदन करणारी ललित रागातील ही बंदिश पाहा

 स्थाई

सदारंग अदारंग तनरंग मनरंग सबरंग

रचनाकार को प्रणाम

अंतरा

रचना के अलग रंग रूप

प्रेमपिया प्राणपिया गुनीदास

शोकपिया सब तुम

रचनाकार हो महान ।।

ललित रागातील बहुतेक बंदिशी या त्यात लागोपाठ येणारया दोन मध्यमांभोवती रेंगाळणार्‍या असतात, पण शंकररावांची ही बंदिश सुरू होते तीच मुळी तार षड्जावरून, असे असूनही मूळ राग स्वरूपाला ते धक्का लागू देत नाहीत म्हणूनच त्यांच्या बंदिशी वेगळ्या आणि ताज्या वाटतात. पंडित सी आर व्यास हे सुप्रसिद्ध गायक आणि बंदिशकार या बंदिशीने इतके भारावले की त्यांनी ती लोकांना प्रत्यक्ष गाऊन दाखवली , इतकेच नाही तर ते शंकररावानविषयी म्हणाले “ आजपर्यंत मी त्यांना पंडित शंकर अभ्यंकर म्हणत होतो, पण आता मी त्यांना आचार्य शंकर अभ्यंकर म्हणून संबोधणार आहे !”

त्यांच्या बंदिशींच्या लोकप्रियतेचे गमक म्हणजे आपल्या मैफिलीत ज्या गायकांनी त्यांच्या बंदिशी गायल्या आहेत त्यांची नावे वानगीदाखल द्यायची झाली तर ती अशी. पंडित यशवंतबुवा जोशी , श्रीमती शोभा गुर्टू , पंडित जगदीशप्रसाद , श्री संजीव अभ्यंकर , श्री राजा काळे , श्रीमती आशा खाडीलकर , श्रीमती वीणा सहस्त्रबुद्धे , देवकी पंडित , अश्विनी भिडे , आरती अंकलिकर , अर्चना कान्हेरे , पद्मा तळवलकर इ. नावांवरूनही त्याची कल्पना येते

स्वरलयीत सदा रंगलेल्या शंकररावांची जगण्यातली सौंदर्यदृष्टी आणि तलख विनोदबुद्धी या दोन्हीचा मेळ घालणारा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. एकदा ते आणि मी एका महान तबला वादकाच्या सोलो तबला वादनाला गेलो होतो, कार्यक्रमागोदर कलाकार कक्षात तो तबला वादक हात तापवण्यासाठी आमच्या समोरच सराव करत होता. तेवढ्या दहा पंधरा मिनिटात तबल्याच्या नाद सौंदर्याचा साक्षात्कारच त्यांनी आम्हाला घडवला.

नंतर आपले तबलावादन सादर करण्यासाठी तो व्यासपीठावर गेला, तेव्हा मी पण सभागृहात जाण्यासाठी उठू लागलो. तेव्हा शंकरराव म्हणाले  “त्या गर्दीत कुठे जातोस ? इथेच बसून गप्पा मारू, इथे ऐकू येतंय की !” आमच्या गप्पा सुरू झाल्या त्या तबलावादनाच्या पार्श्वसंगीतावरच! काही मिनिटांपूर्वी आमच्या समोर अत्यंत सुंदर वादन करणार्‍या त्या कलाकाराने बाहेर गेल्यावर टाळ्या मिळवण्यासाठी तिरकीटच्या तयारीचा अगदी अतिरेकच केला. काही वेळाने तबला वादन संपले आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला व नंतर सन्नाटा पसरला . त्या शांततेचा भंग करत शंकरराव माझ्या कानाशी कुजबुजले “ स्टो बंद केल्यासारखे वाटले !” नादसौंदर्य आणि गोंगाट यातला फरकच सरांनी अधोरेखित केला. आहे की नाही गम्मत!

गाणं शिकताना ज्या सदारंग आणि अदारंगांच्या अनेक बंदिशी शिकायला व ऐकायला मिळाल्या त्यातल्या प्रत्यक्ष सदारंगांचाच सहवास शंकररावांच्या रूपात मला लाभला अशी माझी भावना आहे . सध्या त्यांच्या वयाचे 87 वे वर्ष सुरू आहे नि त्या निमित्ताने त्यांचे जीवनगौरवाचे अनेक सत्कार सुरू असतात ,त्या निमित्ताने या आठवणींचा हा लेखनप्रपंच!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.