Dimple Kapadia@63: एकेकाळी रसिकांच्या हृदयावर राज्य करणा-या ‘बॉबी’ डिंपलला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Dimple Kapadia @ 63: Happy Birthday to 'Bobby' Dimple who once ruled the hearts of fans! आठ जून, 'बॉबी' म्हणजे डिंपल कपाडिया यांचा जन्मदिवस. डिंपल यांनी आज 64 व्या वर्षात पदार्पण केले. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

एमपीसी न्यूज – हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत यशस्वी दिग्दर्शक राज कपूर यांनी 1973 साली एक लोभसवाणी प्रेमकथा पडद्यावर आणली. त्यात त्यांनी दोन कोवळ्या चेह-यांना लॉन्च केले. एक म्हणजे त्यांचा मुलगा ऋषी कपूर आणि दुसरी म्हणजे एक षोडशवर्षीय नवथर तरुणी डिंपल कपाडिया. आणि तो चित्रपट होता ‘बॉबी’. त्याआधी मेरा नाम जोकर’ने राज यांना आर्थिकदृष्ट्या संपवले होते. मात्र या दोघांच्या फ्रेशनेसने बॉलिवूडला वेगळी प्रेमकथा दिली.

आठ जून, ‘बॉबी’ म्हणजे डिंपल कपाडिया यांचा जन्मदिवस. डिंपल यांनी आज 64 व्या वर्षात पदार्पण केले. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

काही समीकरणे आपल्या डोक्यात फिट्ट बसतात. त्यातलेच एक म्हणजे बॉबी म्हणजे फक्त आणि फक्त डिंपलच. पुढे ‘बॉबी’ रिलीज झाल्या झाल्या डिंपलने आणखी एक बॉम्ब चाहत्यांवर टाकला. आपल्यापेक्षा वयाने दुप्पट मोठ्या असलेल्या काका म्हणजे सुपरस्टार राजेश खन्नाशी तिने लग्न केले. आणि नुसते लग्नच नाही केले तर चित्रपटसंन्यास देखील घेतला.

पुढे दोन मुली झाल्यानंतर डिंपल यांनी ऋषी कपूर यांच्याच सोबत ‘सागर’ या चित्रपटातून पुनरामगन केले. अर्थात त्यांच्या दिसण्यावर कुठेही वयाची छाप पडली नव्हती. फ्रेशनेस तसाच कायम होता. मात्र पुढे अनेक चित्रपट करुन देखील त्यांना म्हणावे तसे यश लाभले नाही.

आज त्यांच्या एका व्हायरल होत असलेल्या डान्सच्या व्हिडीओची चर्चा होते आहे. त्यांचा एक जुना डान्स व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला असून त्या पती दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांच्या गाण्यावर बेधुंद होऊन थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ  सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या भाचीच्या म्हणजेच सौदामिनी मट्टूच्या रिसेप्शनमधील आहे.

या रिसेप्शन पार्टीमध्ये त्या ‘जय जय शिव शंकर’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे गाणं वाजू लागताच डिंपल त्यावर थिरकू लागल्या. राजेश खन्ना यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं वाजू लागताच डिंपल स्वत:ला रोखू शकल्या नाहीत आणि त्यांनी या गाण्यावर ठेका धरण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत असून पुन्हा एकदा डिंपल यांचा दिलखुलास अंदाज चाहत्यांची मनं जिंकत आहे.

आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा जावई अक्षयकुमारची एक मुलाखत पुन्हा चर्चेत आहे. त्यात अक्षयला त्याची सर्वात आवडती हिरॉईन कोण की जिच्यासोबत तुला डेटवर जायला आवडेल असे विचारले होते. त्यात अक्षयने गंमतीशीर उत्तर दिले होते. तो म्हणाला मला डिंपलजीं बरोबर डेटला जाऊन रात्रभर त्यांच्या मुलीविषयी गप्पा मारायला आवडतील. अर्थातच डिंपलची मुलगी म्हणजे ट्विंकल जी अक्षयची पत्नी आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.