Pimpri : थेट खरेदी भोवली, क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिका-याला सक्त ताकीद

एमपीसी न्यूज – स्वच्छता जनजागृती अभियानाअंतर्गत टोपी, टी-शर्ट आणि महिलांसाठी अ‍ॅप्रन, ट्रॅकसुट थेट पद्धतीने खरेदी करणा-या क्षेत्रीय अधिकारी महिलेसह सहाय्यक आरोग्य अधिका-याला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सक्त ताकीद दिली आहे.

महापालिका अ क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे आणि सहाय्यक आरोग्याधिकारी महादेव शिंदे अशी कारवाई झालेल्या अधिका-यांची नावे आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत महापालिका हद्दीतील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी आणि स्वच्छतेबाबत प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने जनजागृती अभियान व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी टोपी, टी-शर्ट तसेच महिलांसाठी अ‍ॅप्रन, ट्रॅकसूट देण्यात आले. या साहित्याची खरेदी निविदा प्रक्रिया राबवून करणे गरजेचे होते. मात्र, अ क्षेत्रीय अधिकारी दुरगुडे यांनी सुमारे दोन लाख रूपये किमतीच्या साहित्याची खरेदी थेट पद्धतीने केली. ही बाब निदर्शनास आल्याने आशादेवी दुरगुडे आणि सहायक आरोग्याधिकारी शिंदे यांना 18 नोव्हेंबर 2019 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

या कारणे दाखवा नोटीसीवर त्यांनी केलेले खुलासे असमाधनकारक असल्याचा निष्कर्ष आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे. तथापि, या साहित्य खरेदीस स्थायी समितीने दिलेली मान्यता विचारात घेऊन दोघांनाही एक वेळ संधी देण्यात आली आहे. त्यानुसार, आशादेवी दुरगुडे आणि महादेव शिंदे यांना आयुक्तांनी सक्त ताकीद दिली आहे. तसेच यापुढे आवश्यक साहित्याची खरेदी करताना निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.