Talegaon : शिरगाव पोलिसांकडून दारूभट्टी उध्वस्त

एमपीसी न्यूज – पवना नदीच्या किनारी हातभट्टीची दारू तयार करणा-या एका दारू भट्टीवर छापा मारत शिरगाव पोलिसांनी भट्टी उध्वस्त केली आहे. या कारवाईमध्ये दोन लाख 10 हजार रुपयांचे दारू बनविण्याचे रसायन आणि इतर साहित्य नष्ट करण्यात आले आहे.

कुमार रमेश नानावत, जतीन जितेंद्र राजपूत (दोघे रा. शिरगाव, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी माहिती मिळाली की, शिरगाव येथे पवना नदीच्या किनारी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भट्टी लावण्यात येत आहे. त्यानुसार, शिरगाव पोलिसांनी परिसरात सुरु असलेल्या दारूभट्टीवर छापा मारला. यामध्ये एक हजार लिटरचे पत्र्याचे बॅरल, एक हजार लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन, तीन हजार लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन आणि पत्र्याचा बॅरल असे साहित्य आढळून आले. सुमारे दोन लाख 10 हजार रुपयांचे साहित्य पोलिसांनी नष्ट केले. याबाबत शिरगाव पोलीस चौकीत दोघांवर दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, पोलीस कर्मचारी राकेश पालांडे, सुभाष दळे, दीपक काठे, योगेश नागरगोजे, अतुल भोसले, जयदीप कोठावळे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.