Pimpri News : सृजन, कल्पनाशक्तीला चालना दिल्यास नव-आविष्काराची निर्मिती – राजेश पाटील

एमपीसी न्यूज – सृजनशक्ती आणि कल्पनाशक्तीला अधिक चालना दिल्यास नव-आविष्काराची निर्मिती होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता असून त्यांनी केलेल्या नाविन्यपर्ण निर्मितीतून सहजतेने समाजसेवा करता येते असे प्रतिपादन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील जुन्या, बेवारस, विनावापर पडून असलेल्या सर्व प्रकारच्या सायकली महानगरपालिकेमार्फत गोळा करुन महापालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अशा सायकलची किरकोळ दुरुस्ती करुन त्यांना वापरायोग्य बनविले. शहरातील गरजू मुले, विद्यार्थी तसेच व्यक्तींना आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते या सायकल वितरित करण्यात आल्या तसेच स्क्रॅप आर्ट गॅलरी या उपक्रमांतर्गत टाकाऊ, विनावापर बोर्डचा वापर करुन चांगल्या प्रकारच्या कलाकृती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त पाटील बोलत होते.

मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षक संस्थेत झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय, उप आयुक्त संदीप खोत, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, आय.टी.आय.चे प्राचार्य शशिकांत पाटील, गट निदेशक विजय आगम, प्रकाश घोडके, शर्मिला काराबळे यांच्यासह मोरवाडी आय.टी.आय. तसेच कासारवाडी येथील मुलींच्या आय.टी.आय. मधील विद्यार्थी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहर ही औद्येगिक नगरी असून येथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी कुशल विद्यार्थी घडविण्यासाठी महापालिकेने औद्येगिक प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे, ही महत्वाची गोष्ट आहे असे नमुद करुन आयुक्त पाटील म्हणाले, या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी टाकाऊ आणि जुन्या सायलक दुरुस्त करुन त्या पुनर्वापरासाठी तयार केल्या हा त्यांच्या कौशल्याचा वेगळा नमुना आहे.

याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुण आणि कल्पनाशक्तीला वाव दिल्यास त्यातून समाजोपयोगी निर्मिती होऊ शकते हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. केरळ राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत ओरिसामधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी प्रभावी आणि महत्वपुर्ण भुमिका बजावली. आपत्तीकाळात खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करण्यासाठी या पथकाने केलेले काम कौतुकास्पद होते.

याचा संदर्भ देऊन आयुक्त पाटील म्हणाले, महापालिका आय.टी.आय. च्या विद्यार्थ्यांमध्ये देखील अशा प्रकारच्या समाजसेवा करण्याची वृत्ती आहे. त्यांनी जुन्या सायकल दुरुस्त करुन त्या वापरायोग्य बनविल्या तसेच टाकाऊ वस्तूंपासून स्क्रॅप आर्ट गॅलरी तयार केली ही कौतुकास्पद बाब आहे. या विद्यार्थ्यांमधील बालसुलभ कौशल्याला अधिक चालना दिल्यास ते नवनवीन कल्पना विकसित करु शकतात. अभ्यासापलीकडे विचार करुन प्रत्येकाने अशी कौशल्ये विकसित केली पाहिजेत आणि याद्वारे समाजसेवेसाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

महानगरपालिकेमार्फत क्षेत्रीय कार्यालयांचे स्तरावर “सायकल बॅंक” ही अभिनव संकल्पना राबविली जात आहे. सदर उपक्रमांतर्गत प्राप्त होणा-या सायकलची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत किरकोळ दुरुस्ती करुन पुनर्वापर करण्यायोग्य बनविण्यात येतात. पेंटर जनरल, वेल्डर व फिटर या ट्रेडच्या निदेशक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून या सायकलींची दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्त झालेल्या १७ सायकलींचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य शशिकांत पाटील यांनी केले, सुत्रसंचालन गट निदेशक मंगेश कलापुरे यांनी तर आभार प्रदर्शन जीवन ढेकळे य़ांनी केले. यावेळी पेंटर जनरल प्रशिक्षणार्थी आणि कोपाच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये तोफीक आमीन कांडगावकर,समर्थ सचिन जाधव,प्रज्योत विनोद कडू,हेमंत पुंडलिक ठोसरे,राज सुनिल मोर,रितेश हेमंत गायकवाड,विराज संतोष दाते,रितेश महेंद्र निशिगंध,यश निलेश ननावरे,हरेश अनिल आमृतकर,यश बिरु कोकणे, संदिप त्र्यंबक भुत्ते, भुषण कुंदण येवले, कृष्णा नंदू राक्षे, वैभव गजानन मिसाळ, आरती मायनीकर, निशा वैरागे, श्रुती पवार, सिद्धांत अनंत राजगुरु करिष्मा गणेश बोथ,लायबा अकबर फक्की,सुचेता सोपान्त संत,साक्षी विनायक सुर्यवंशी,लावण्या श्रीनाथ सारोलकर,अंजली शंकर पवार,जयश्री भगवान तुजरे,भक्ती विश्ववाथ जाधव,किरण एकनाथ नवसारे,कुलसुम अब्दुलकदार शेख,श्रृतीका सतीश चव्हाण,रोजमेरी जॉन जेकोब,सुमित्रा सतिश आगळे,स्वरुपा संतोष वायकर,वैशाली शशीकांत बरांगळे,रुतुजा शशीकांत मोरे,पायल प्रकाश जाधव,पुजा गोपाळ कांबळे ,माया विनय सोनावणे, आणि निदेशक विकास क्षीरसागर यांचा समावेश आहे.

सायकल वाटप झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रिहान अमीर खान,जरणा चक्र नेपाळी,श्रावणी मलप्पा गंगानगर, हर्षदा सर्जेराव रणदील, राधिका चंद्रकांत घोसले, अन्सारी शहनाज अशफाकउल्लाह, उस्मानी जुनैद जाहिद, बागवान महेक दौलत, अन्सारी मो. आलम अलिमोददीन, दिपक मारुती बंडेवाड, नेटके यश महादेव यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.