Moshi Crime News : पोलीस कर्मचाऱ्याने केली पत्नीला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – पोलीस कर्मचारी पतीने त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली. पोलीस पतीच्या पोलीस मैत्रिणीने देखील जखमी पत्नीला शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोन्ही पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 28) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास लक्ष्मीनगर, मोशी येथे घडली.

नितीन कैलास औटी (वय 35), आसावरी सुनील आपटे (वय 34, दोघे रा. दक्षिण लक्ष्मीनगर, मोशी) यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रूपाली नितीन औटी (वय 32) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 28) याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आरोपी पती नितीन औटी हा दारू पिऊन घरी आला. पत्नी रुपाली यांनी दरवाजा न उघडल्याने त्याने दरवाजावर लाथा मारल्या. त्यानंतर तो रूपाली यांना शोधण्यासाठी खाली गेला. रूपाली या घरातच असल्याचे समजल्याने तो पुन्हा घरी आला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची आरोपी मैत्रीण होती.

‘तू घरातून कुठे गेली होतीस’, अशी विचारणा करीत रूपाली यांच्या नाकावर, तोंडावर, पोटात कमरेवर नितीन याने लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. आसावरी आपटे हिने शिवीगाळ करीत तुझ्याकडे पाहून घेतो, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पुजारी याबाबत अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी अद्यापही आरोपी पोलिसांना अटक केलेली नाही. जखमी पत्नी फिर्यादी रूपाली या अद्यापही रुग्णालयात दाखल आहेत. या घटनेतील दोन्ही आरोपी पोलीस असल्याने एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्ह्याबाबत लपवाछपवी केली.

याबाबत पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस कर्मचारी नितीन औटी याला नियंत्रण कक्षाला संलग्न केले आहे. तसेच त्याची मैत्रीण ही पोलीस आयुक्‍तालयात लिपिक असून तिची बदली पुणे शहरात झाली आहे. तिला देखील कार्यमुक्‍त केले असल्याची माहिती पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.