Chakan : राष्ट्रवादीवाल्यांना धरणाच्या जवळ फिरकू देऊ नका ; उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीची मला काळजी वाटते आहे, आजूबाजूला दुष्काळ पडतो आहे, तेव्हा राष्ट्रवादीवाल्यांना धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर करत अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याची अप्रत्यक्षपणे आठवणच करून दिली. ते सोमवारी (दि.22) राजगुरुनगर ( ता. खेड, जि.पुणे) येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मभूमीत देशासाठी बलिदान देणारे तीन क्रांतीकारक भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या भव्य “स्मृतीशिल्प” व भिमानदीवरील “हुतात्मा राजगुरु” पुलाचे लोकार्पण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते राजगुरुनगर येथे सोमवारी संपन्न झाला. त्यावेळी ठाकरे बोलत होते.

यावेळी खासदार शिवाजी आढळराव,आमदार सुरेश गोरे,आमदार निलम गो-हे,जिल्हा अध्यक्ष राम गावडे यांच्या सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपचा देखील खास ठाकरे शैलीत समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका ही दुटप्पी आहे. भाषण करताना सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव घ्यायचं आणि राजधानीत न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करायचा असं त्यांचं धोरण आहे. पुन्हा मीच पंतप्रधान होणार मीच मुख्यमंत्री होणार असे दावे केले जात आहेत. आम्ही यांच्यासोबत पाच वर्षे कशी काढली आमचं आम्हाला ठाऊक अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘एकला चलो’चा राग आवळला.

दरम्यान क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मभूमीत सुखदेव भगतसिंग राजगुरू यांचे हे स्मृतिशिल्प असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा करण्यात आला . या क्रांतिकारकांच्या शिल्पामध्ये चारही बाजूंनी दगडी संरक्षक भिंत करण्यात आली आहे आतील बाजूस चांगल्या दर्जाची झाडांची लागवड करून  सुसज्ज उद्यान करण्यात आले आहे.

 दरम्यान, सध्या शेतकरी आणि जनतेच्या भेटी मी घेत आहे, सर्वत्र परिस्थिती अत्यंत बिकट आहे. रोज राज्यकर्ते म्हणतात की, 2030 पर्यंत सर्वांना घरे मिळतील. म्हणजे तुम्हाला त्यांना मतं द्यावी लागणार. नुसत्या घोषणांचा पाऊस पाडायचा आणि मतं मागायची एवढेच त्यांना जमते असे दिसते आहे. दुष्काळाची परिस्थिती असताना घोषणांचा आणि आश्वासनांचा पाऊस सुरु आहे. असं देखील उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.