Pimpri : महापुरुषांना डोक्यावर न घेता डोक्यात घ्या- डॉ. अविनाश सांगोलेकर

एमपीसी  न्यूज – विविध जातींच्या लोकांनी आपल्या समाजातील महापुरुषांना डोक्यावर घेऊन समाधान न मानता त्यांना डोक्यातही घेतले पाहिजे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीवर्षात हे भान शासनाने आणि समाजानेही ठेवले पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी भोसरी येथे केले.

मातंग साहित्य परिषदेने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात म्हणून आयोजित केलेल्या साहित्यिक कृतज्ञता सोहळा आणि कवी संमेलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लक्षवेधी मासिकाच्या संपादिका अँड. कोमल ढोबळे-साळुंखे, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राजन लाखे, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहिरराव, लेखक शंकर तडाखे, अजय साळुंखे, महापालिकेच्या अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवाचे अध्यक्ष सतीश भवाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या शासनाने अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात सोडवाव्यात अशी अपेक्षा साळुंखे यांनी व्यक्त केली. वर्षभरात अण्णा भाऊ साठे महामंडळ अनेक उपक्रम राबविणार असल्याचे गोरखे यांनी नमूद केले. प्रास्ताविक व स्वागत करताना मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक प्रा.धनंजय भिसे यांनी परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. कांदबरीकार सुरेश पाटोळे, कथाकार अण्णा धगाटे, चरित्रकार संपत जाधव, कवि अनिल नाटेकर, ज्येष्ठ साहित्यीक उत्तम बंडू तुपे यांना प्राचार्य डॉ. सांगोलेकर यांच्या हस्ते ‘साहित्यिक कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्कार सोहळ्यानंतर महेंद्रकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यात विश्वनाथ साठे, सुनील भिसे, अनिल नाटेकर, डॉ. गंगाधर रासगे, आसाराम कसबे, सुमंतकुमार गायकवाड, विनोद अष्टुळ, अण्णा कसबे, गणेश आघाव, सीताराम नरके, चंद्रकांत जोगदंड, आत्माराम हारे, आनंद गायकवाड, संतोष ससाणे, गणेश पुंडे, अजय भिलारे, सुरेश पाटोळे, अनिल नाटेकर, शितल इत्यादी कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करून टाळ्यांची दाद मिळवीली. गणेश आगाव ह्यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह संतोष ससाणे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.