Chinchwad News : ‘एमपीसी न्यूज’च्या दिवाळी अंकाची दशकपूर्ती! ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज – सामाजिक, पर्यावरण, साहित्य, कला, संस्कृती अशा सर्व घटकांनी परिपूर्ण असलेल्या ‘एमपीसी न्यूज’च्या ‘अंतरंग’ दिवाळी अंकाचा 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला. ‘एमपीसी न्यूज’च्या चिंचवड येथील मुख्य कार्यालयात सोमवारी (दि. 1) हा प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

‘एमपीसी न्यूज’चा अंतरंग हा बहुरंगी दिवाळी अंक पाहून पिंपरी-चिंचवडचे अंतरंग माझ्या अंतरंगापर्यंत पोहोचले आहेत. एमपीसी न्यूजचा हा दिवाळी अंक संस्कृती आणि लोकशाहीला समर्पित असा दिवाळी अंक आहे, असे गौरवोद्गार डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रकाशन सोहळ्यात बोलताना काढले.

प्रकाशन सोहळ्यासाठी एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, सहयोगी संपादक अनिल कातळे, अंतरंग दिवाळी अंकाचे निमंत्रित संपादक श्रीकांत चौगुले, अंतरंगच्या सहयोगी संपादिका स्मिता जोशी, नामवंत छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर, पत्रकार भगवान राऊत, गणेश यादव, प्रमोद यादव, श्रीपाद शिंदे, सुचित्रा पेडणेकर, आकांक्षा इनामदार, अनुप घुंगुर्डे, प्रवीण टाव्हारे आदी उपस्थित होते.

प्रकाशन सोहळ्यात बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “विवेकाशी इमान राखणं आज कठीण झालं आहे. ऑनलाईन पत्रकारिता ज्या काळात अनेकांच्या मनातही नव्हती, तेव्हा एमपीसी न्यूजने ऑनलाईन पत्रकारिता विकसित केली. आजच्या काळात ध्येयवादी पत्रकारिता कमी झाली आहे. एमपीसी न्यूजने ही पत्रकारिता आजवर केली आहे. एमपीसी न्यूजच्या अंतरंग दिवाळी अंकाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडचे अंतरंग श्रीपाल सबनीसांचे अंतरंग बनले आहे, असे गौरवोद्गार डॉ. सबनीस यांनी काढले.

पुढे बोलताना डॉ. सबनीस म्हणाले, पत्रकारिता हा छंद नाही, तर तो ध्येयवाद आहे. एमपीसी न्यूजने हा ध्येयवाद जपला आहे. शब्द आणि लेखणी जेव्हा गुलाम होते तेव्हा संस्कृती, समाज आणि देशाचे भवितव्य संपते. अशा प्रतिकूलतेमध्ये एमपीसी न्यूजने सत्याशी, वास्तवाशी, ध्येयवादाची इमानदारी जपली आहे. हे चित्र मला बाहेर कुठेही दिसत नाही. माणूस आणि संस्कृती यातील संवादी बेरीज म्हणजे एमपीसी न्यूजचा अंतरंग दिवाळी अंक आहे.

पु ल देशपांडे, बहिणाबाई चौधरी, वसंतराव देशपांडे, बिरजू महाराज, विनोबा भावेंची आई अंतरंगमध्ये आहेत. संस्कृतीची लोकशाही अंतरंगमध्ये आहेत. कलावंत आणि प्रतिभावंतांना अंतरंगने स्थान दिले. बालसाहित्य ते प्रौढांसाठीचे साहित्य अशा सर्व गटातील लोकांसाठीचे साहित्य एमपीसी न्यूजने अंतरंगमध्ये अधोरेखित केले आहे. संस्कृती जगवण्यामध्ये दिवाळी अंकाचे योगदान निर्णायक आहे. संस्कृती संचित जपणारी, विकसित करणारी परंपरा जपताना अंतरंग दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ सात्विक आहे. लोकशाही आणि संस्कृतीला समर्पित असा हा दिवाळी अंक असल्याचेही डॉ. सबनीस म्हणाले.

अंतरंग दिवाळी अंकाचे निमंत्रित संपादक श्रीकांत चौगुले यांनी ‘महाराष्ट्रात दिवाळी अंकाला 112 वर्षांची परंपरा असल्याचे म्हणत एमपीसी न्यूजच्या यावर्षीच्या दिवाळी अंकात विविधांगी साहित्य आहे, असे म्हणत दिवाळी अंकातील अंतरंग उलगडून सांगितले.

एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार यांनी एमपीसी न्यूजच्या 13 वर्षांच्या वाटचालीचा प्रवास उलगडला. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या समस्या, त्यांची मते मांडण्यासाठी एमपीसी न्यूजने हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जगातील 86 देशातील अडीच हजार पेक्षा अधिक शहरांमध्ये एमपीसी न्यूजचे वाचक आहेत. शिवाय जर्नालिजम स्कुलची भूमिका सुद्धा एमपीसी न्यूजने आजवर बजावली असल्याचे संपादक विवेक इनामदार म्हणाले.

निमंत्रित संपादक श्रीकांत चौगुले, स्मिता जोशी, देवदत्त कशाळीकर, पाहुणे पत्रकार भगवान राऊत, आकांक्षा इनामदार, गणेश यादव, प्रमोद यादव, श्रीपाद शिंदे, सुचित्रा पेडणेकर, प्रवीण टाव्हारे, अनुप घुंगुर्डे यांचा डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

एमपीसी न्यूजचे सहयोगी संपादक अनिल कातळे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ पत्रकार स्मिता जोशी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.