Pune : डॉ. सुप्रीत मराठे यांना अमेरिकेत बोस्टन येथे ह्रदय शल्य चिकित्सा फेलोशिप

एमपीसी न्यूज – पुणे येथील सुवर्णपदक प्राप्त हृदय शल्यचिकित्सा तज्ज्ञ डॉ. सुप्रीत प्रकाश मराठे, एम. सी. एच. (सी .व्ही. टी. एस.) (हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ ) यांना जगविख्यात बोस्टन चिल्ड्रेन्स्  हाॅस्पिटल, अमेरिका येथील ‘बाल हृदय शल्य चिकित्सा’ विभागात जुलै 2019 पासून पुढील उच्च प्रशिक्षणासाठी फेलोशिप मिळाली आहे. सदर संस्था अमेरिकेतील नामवंत हार्वर्ड विद्यापीठाशी संलग्न आहे. त्यानिमित्त नुकतेच ते अमेरिका येथे रवाना झालेत.

प्रख्यात बाल हृदय शल्य चिकित्सा तज्ज्ञ डॉ. पेड्रो डेल निडो यांच्या मार्गदर्शनाखाली ते नवजात अर्भक व बालकांवर करण्यात येणाऱ्या विविध व क्लिष्ट हृदय शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतील. अशा प्रकारच्या तज्ज्ञांची भारतात उणीव आहे . पुणे येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश मराठे यांचे ते चिरंजीव होत.

गेली साडेतीन वर्षे डाॅ. सुप्रीत यांनी ऑस्ट्रेलियात वेस्टमिड  चिल्ड्रेन्स्  हॉस्पिटल येथे  प्रख्यात बाल हृदय शल्य चिकित्सा तज्ज्ञ डॉ. डेव्हिड विनलाॅ यांच्या कडे तसेच ब्रिस्बेन येथील क्विन्सलँड चिल्ड्रेन्स् हाॅस्पिटल येथे  प्रख्यात बाल ह्रदय शल्य चिकित्सा तज्ज्ञ डाॅ. नेल्सन अल्फान्सो यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या फेलोशिप संपादित केलेली आहे.  डॉ. सुप्रीत यांचे अनेक शोध निबंध विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या पत्नी डॉ शिल्पा सुप्रीत मराठे यांनीही ऑस्ट्रेलिया येथे बाल हृदय चिकित्सा तज्ज्ञ डाॅ. रॉबर्ट जस्टो यांच्या मार्गदर्शनाखाली पेडियाट्रिक कार्डिओलॉजी फेलोशिप यशस्वीरीत्या संपादित केलेली आहे. त्याही त्याचे सोबत अमेरिकेत पुढील प्रशिक्षण घेतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.