Pimpri News : प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा 30 नोव्हेंबरपर्यंत तयार करा, निवडणूक आयोगाचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आता तिस-यावेळी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीने प्रभाग रचना केली जाणार आहे. प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत पूर्ण करुन सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी महापालिकेला दिले आहेत. महापालिकेच्या नगरसेवक संख्येत 11 ने वाढ झाली असून आता नगरसेवक संख्या 139 होणार आहे तर, 46 प्रभाग असणार आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 25 ऑगस्ट 2021 रोजी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. पण, त्यासाठीची मुदत दिली नव्हती. त्यानंतर राज्य सरकारने सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत बदल करत मुंबई वगळता 17 महापालिकांच्या निवडणुका तीनसदस्यीय पॅनल पद्धतीने घेण्याचा निर्णय 30 सप्टेंबर रोजी घेतला. त्यानंतर महापालिकेने त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीनुसार प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले.

परंतु, राज्य सरकारने राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय 27 ऑक्टोबर रोजी घेतला. त्यामुळे पुन्हा नव्याने प्रभाग रचनेचा प्रारुप कच्चा आराखडा तयार करावा लागणार आहे.

त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा तयार करावा. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आराखड्याचे काम पूर्ण करावे. प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार झाल्यानंतर प्रगणक गट, प्रभाग दर्शविणा-या KML फाईल तसेच सर्व प्रभाग व त्यामध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्येचे विवरणपत्र असलेला पेन ड्राईव्ह सील करुन राज्य निवडणूक आयोगास गोपनीयरित्या खास दुतामार्फत सादर करावा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनास सणस यांनी महापालिकेला दिले आहेत.

महापालिकेत 139 नगरसेवक तर 46 प्रभाग असणार!

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महापालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 2021 च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहित धरुन अधिनियमात नमुद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत 17 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात राज्य सरकारने घेतला आहे.

त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 11 ने वाढणार आहे. सध्या पालिकेचे 128 नगरसेवक आहेत. 11 नगरसेवक वाढणार असल्याने महापालिकेची नगरसेवक संख्या 139 होणार आहे. तर, 46 प्रभाग असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.