Pimpri News : निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेच्या आराखड्यात बदल?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा निवडणूक आयोगाला सादर करुन 15 दिवसांचा कालावधी उलटून गेला. आयोगाने आराखड्याबाबत अधिकची मागविलेली माहिती पालिका प्रशासनाने सादर केली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या आराखड्यात निवडणूक आयोग काय बदल करणार? याबाबत कमालीची उत्सुक्ता निर्माण झाली आहे.

महापालिका प्रशासन निवडणूक आयोगाने दिलेल्या 30 नोव्हेंबरच्या मुदतीत आराखडा तयार करु शकले नव्हते. प्रशासनाने आराखड्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. आयोगाने 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. महापालिकेची 2022 ची निवडणूक तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा तयार केला. पालिकेच्या निवडणूक विभागाने तो आराखडा सोमवारी (दि.6) राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता.

राज्य निवडणूक आयोगासमोर शनिवारी (दि.11) आराखड्याचे सादरीकरण झाले. आयोगाकडून काटेकोरपणे आराखड्याची तपासणी करण्यात आली. प्रभागात लोकसंख्या योग्य प्रमाणात आहे का? नैसर्गिक प्रवाह, रस्ते, उड्डाणपूल सीमा मानून रचना केली आहे का? याची तपासणी केली. यामध्ये आयोगाने काही त्रुटी काढल्या आहेत. बदल सुचविले आहेत. चार सदस्यांचा कोणता एक प्रभाग करायचा याचे पाच पर्यायही महापालिका प्रशासनाला दिल्याचे समजते.

दरम्यान, किती बदल सुचविले, याबाबत विचारणा केली असता ”आराखडा जशाच तसा स्वीकारला जात नसतो” असे सांगत अधिका-यांकडून त्यावर अधिक भाष्य केले जात नाही. त्यामुळे आराखड्याबाबत कमालीची उत्सुक्ता निर्माण झाली आहे. आराखडा सादर करुन 15 दिवस उलटले तरीही त्याबाबत काहीच चित्र स्पष्ट होत नाही. प्रभागरचना नेमकी कशी आहे. याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.

आराखड्याबाबत आयोगाला अधिकची माहिती दिली – वाघ

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, ”राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा तयार केला. तो आराखडा आयोगाला सादर केला. आयोगात त्याचे सादरीकरण झाले. आयोगाने काही अधिकची माहिती मागविली होती, ती माहिती देखील दिली आहे. त्यानुसार महापालिकेचा आराखडा जशाच तशा ठेवायचा, पूर्ण बदलायचा की काही बदल करायचे याचा पूर्णपणे अधिकार आयोगाचा आहे. आयोगाकडून जो आराखडा येईल. तो प्रारुप म्हणून प्रसिद्ध केला जाईल”.

आराखड्याबाबत कमालीची उत्सुक्ता!

प्रभाग रचनेकडे नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. नवा प्रभाग कसा असेल, त्याला कोणता भाग जोडला असले, कोणता भाग वगळला असेल याबाबत कमालीची उत्सुक्ता आहे. सर्वत्र आराखड्याचीच चर्चा होत आहे. अनेकांकडून प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, प्रशासन काहीच सांगत नसल्याने प्रयत्न फोल ठरत आहे. आयोगाने महापालिकेच्या आराखड्यात किती बदल केले की आराखडा जशाच तशा स्वीकारला, नागरिकांसाठी आराखडा कधी प्रसिद्ध होईल? याबाबत इच्छुकांकडून निवडणूक विभागाकडे विचारणा केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.