Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला, तीन वर्षांत 5,17,322 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी

एमपीसी न्यूज – देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. 2018 ते 19 जुलै 2021 या कालावधीत देशात 5 लाख 17 हजार 322 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. अवजड उद्योग राज्यमंत्री क्रिशन पाल गुर्जर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

गुर्जर यांनी उत्तरात अशी माहिती दिली आहे की, ‘देशात इलेक्ट्रिक/हायब्रीड वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने फेम इंडिया अर्थात फास्टर ऍडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अॅण्ड इलेक्ट्रिक व्हेईकल्स ही योजना 2015 मध्ये सुरू केली होती. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची एक एप्रिल 2019 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरू आहे.’

‘यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या टप्प्यात सार्वजनिक आणि शेअर पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या साधनांचे विद्युतीकरण आणि 7090 ई-बसेस, 5 लाख ई- तिचाकी, 55,000 ई- चारचाकी प्रवासी वाहने आणि 10 लाख ई- दुचाकी यांना अनुदानाचे पाठबळ देण्यावर भर दिला जात आहे, ‘ असेही सल्याचे गुर्जर यांनी म्हटले.

ई- दुचाकी, ई- तिचाकी आणि ई- चारचाकी वाहनांचे उत्पादन करणाऱ्या 38 ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सची (ओईएम) फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 9 ऑगस्ट 2021 पर्यंत नोंदणी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.