Nigdi : स्वरसागर महोत्सवातील बहारदार नृत्य, गायन व वादनात रसिक मंत्रमु्ग्ध

 एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आयोजित रौप्य महोत्सवी स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाला  शनिवारपासून सुरुवात झाली.

Pimpri :  कुठलाही पुरस्कार शक्ती, ताकद, उर्जा देऊन जातो – पं. नंदकिशोर कपोते

यानिमित्ताने  नृत्य, गायन व वादनाच्या बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या वेळच्या स्वरसागर महोत्सवात शनिवारी बॉलिवूड क्लासिकल गीते संदीप उबाळे, अली हुसेन, अभिलाषा चेल्लम व स्वरदा गोडबोले यांनी ये दिल और उनकी निगाहों के साये, मन रे तू काहे ना धीर धरे, जा तोसे नही बोलू कन्हैया, कुहू कुहू बोले कोयलिया, चलो एकबार फिरसे,  नैनों में बदरा छाये, मथुबन में राथिका नाचे रें आदि गीते सादर केली.

ज्यांची संवादिनी त्यातील बारकाव्यांसह विशेष सादर होते असे म्हटले जाते असे  संवादिनी वादक सचिन जांभेकर यांनी परदा हैं परदा हे गीत विशेषत्वाने सादर केले.

त्यांना साथ संगत केदार परांजपे – सिंथेसायझर,  सचिन जांभेकर – संवादिनी, अमृता ठाकूरदेसाई – सिंथेसायझर, विशाल गंड्रतवार – तबला, नीलेश देशपांडे – बासरी, प्रसाद गोंदकर – सतार, अजय अत्रे – रिदम आणि केदार मोरे – तालवाद्य यांनी साथसंगत केली. या सुंदर कार्यक्रमाचे तितकेच अभ्यासपूर्ण आणि ओघवते निवेदन ज्येष्ठ निवेदक मंगेश वाघमारे यांनी केले.

या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज सेठिया यांनी चंदन सा बदन हे सदाबहार गीत उत्तमरित्या सादर केले. तसेच पृथ्वीराज इंगळे या विशेष बालकलाकाराने पूछो ना कैसे मैने रैन बीतायी हे गीत उत्कृष्ट पद्धतीने सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली.

पुढील सत्रात  शशांक सुब्रह्मण्यम यांनी कर्नाटक शैलीतील बासरी वादन सादर  केले. हिंदुस्थानी शैली आणि कर्नाटक शैली अशा गायन वादनाच्या वेगवेगळ्या शैली आहेत. यंदा प्रथमच कर्नाटक शैलीतील बासरी वादन महोत्सवात सादर करण्यात आले. शशांक यांनी यावेळी बासरीवर राग पूर्वी कल्याणी सादर केला. त्यात कर्नाटक शैलीत रागम, तानम आणि पल्लवी म्हणजे हिंदुस्थानी शैलीतील जोड, झाला आणि बंदिशीचे सादरीकरण केले. त्यांना अत्यंत दमदार आणि जोरकस मृदंगमची साथ पत्री सतीश कुमार  यांनी आणि तबला साथ ओजस अढीया यांनी केली.

त्यानंतर नृत्यकला मंदिरच्या राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी विद्यार्थिनींनी गुरु तेजश्री अडिगे यांचे दिग्दर्शनाखाली भरतनाट्यम शैलीतील नृत्यरंग सादर केला. संतोष नृत्य करी, क्षमवूनी विघ्ने सारी या हंसध्वनी रागातील गणेश कीर्तनम या रचनेने नृत्याला सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर नटराजाच्या विविध लीलांचे वर्णन असणारी नटेश कौतुकम ही रचना सादर करण्यात आली. ज्येष्ठ नृत्यगुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी निर्मित केलेली राग सरस्वती मधील सरस्वती वंदना सादर करण्यात आली. त्यानंतर नृत व नृत्यातील बारकावे सांगणारी कृष्ण वर्णम ही रचना सादर करण्यात आली. परित्राणाय साधूनाम या गीतेतील श्लोकावर आधारित  ही रचना नृत्यातील बारकावे, भाव, पूर्णता दर्शवणारी होती. नृत्यकला मंदिरच्या राष्ट्रीय स्तरावरील एकूण सोळा विद्यार्थिनींनी या विविध रचना अत्यंत सुंदरतेने त्यातील भाव, रस, परिपोषासह सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमासाठी स्मिता देशमुख यांनी विशेष सहकार्य केले. तसेच सूत्रसंचालन सुरेखा कुलकर्णी यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.