Pimpri Crime News : ‘सेवा विकास’च्या माजी पदाधिकाऱ्यांच्या विरोधातील पुराव्याचे दस्तऐवज चोरीला; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बँकेचे माजी चेअरमन आणि माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्यावर पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याबाबतचे महत्वाचे पुरावे असलेले दस्तऐवज पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरून नेल्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 30 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी सात वाजता पिंपरी येथील दि सेवा विकास बँक येथे घडला.

बँकेची एच आर ऑफिसर डॉली मुकेश सेवानी (रा. वैभवनगर, पिंपरी), लोन डिपार्टमेंट ऑफिसर निखिता महेश चांदवानी (रा. सुखवानी कॅसेल, पिंपरी), वाहन चालक सागर खेडकर (रा. श्रीनगर, रहाटणी, काळेवाडी), वाहन चालक गोविंद श्रीवास (रा. नढेनगर, पुणे), माजी चेअरमन अमर मुलचंदानी (रा. पिंपरी), माजी अप्पर सीईओ निखिल शर्मा (रा. पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत मनोज लक्ष्मणदास बक्षाणी (वय 52, रा. साई चौक, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉली या सेवा दि सेवा विकास बँकेत एच आर मॅनेजर म्हणून काम करत होत्या. डॉली, निखिता, सागर आणि गोविंद यांनी मुलचंदानी आणि शर्मा यांच्याशी संगनमत करून गुन्हेगारी कट रचला.

मुलचंदानी आणि शर्मा यांच्यावर पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या बाबतचे महत्वाचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी बँकेचे कर्मचारी असताना महत्वाचे दस्तऐवज चोरून नेले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.