Pimpri news : खोट्या तक्रारीची पोलिसांनी चौकशी करावी – देहूरोडच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पोलिसांनी खोट्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई केल्यास देहूरोड शहराची शांतता भंग होण्याची शक्यता आहे. यामुळे देहूरोडकरांचा अपमान होऊ शकतो.

एमपीसीन्यूज : देहूरोड शहरातील काही समाजकंटक शहरातील व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या बांधकामांविषयी पोलिसांकडे खोट्या तक्रारी करुन पैसे उकळण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे यासंदर्भात दाखल होणाऱ्या तक्रारींची शहानिशा करावी, अशी मागणी देहूरोड शहरातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात या शिष्टमंडळाने नुकतीच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी प्रमुख राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य उपस्थित होते.

देहूरोड शहरात मागील काही दिवसांपासून काही समाजकंटक मंडळी शहरातील आणि बाजारपेठेतील बांधकामांबाबत पोलिसांकडे खोट्या तक्रारी करुन पैसे उकळण्याचे काम करीत आहेत.

पैशाची मागणी करणाऱ्या एका समाजकंटकाविरोधात व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यामुळे संबंधिताने पुन्हा प्रतिष्ठित व्यापाऱ्यांविरोधातही अशा खोट्या तक्रारी केल्या. यामागे काही अपप्रवृत्ती आहेत. त्यामुळे अशा तक्रारीची शहानिशा करुनच कार्यवाही होणे गरजेचे आहे.

पोलिसांनी अशा खोट्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई केल्यास देहूरोड शहराची शांतता भंग होण्याची शक्यता आहे. यामुळे देहूरोडकरांचा अपमान होऊ शकतो.

शिवाय खोट्या तक्रारींवर कारवाई झाल्यास पैसे उकळणाऱ्यांचे धाडस वाढेल. त्यामुळे वैश्य समाज मंदिर येथे व्यापाऱ्यांकडे पैशाची मागणी करणाऱ्या समाजकंटकाच्या खोट्या तक्रारीची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, सदस्य व काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, सदस्य विशाल खंडेलवाल, राहूल बालघरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, शिवसेनेचे शहरप्रमुख भरत नायडू, भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, ‘रिपाइं’चे ( आठवले गट) शहराध्यक्ष सुनील गायकवाड, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष लहूमामा शेलार, शिवसेनेचे मावळ तालुका संघटक रमेश जाधव, कॅन्टोमेन्ट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मदन सोनिगरा, भाजपचे माजी शहराध्यक्ष महावीर बरलोटा, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मिकी कोचर, ‘रिपाइं’चे (आठवले गट) माजी जिल्हा उपाध्यक्ष इंद्रपालसिंग रत्तू, भाजपचे अमोल नाईकनवरे, सूर्यकांत सुर्वे, महेंद्र गायकवाड, राष्ट्रवादीचे अँथोनी स्वामी आदी उपस्थिती होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासोबत देहूरोडमधील बांधकामांबाबतच्या खोट्या तक्रारींविषयी सकारात्मक चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत कुणावरही खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. तसेच देहूरोडमधील  माहिती समजण्यासाठी त्यांनी राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्यांचा व्हॉटसॲप ग्रुप बनविण्याची सूचना केली. त्यानुसार व्हॉटसॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. रघुवीर शेलार – उपाध्यक्ष, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड.

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल कृष्णप्रकाश यांचा शिष्टमंडळाच्यावतीने  पुष्पगुच्छ, भगवदगीतेची प्रत आणि अभिनंदन पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.