Pune News : पुण्यातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध व्यावसायिक बेपत्ता

एमपीसी न्यूज: ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम विश्वानंद पाषाणकर (वय 64) हे बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. 

व्यवसायात मोठे नुकसान झाल्यामुळे मोटार चालकाकडे सुसाईड नोट ठेवून ते मॉडेल कॉलनी येथून बेपत्ता झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गौतम पाषाणकर हे

पाषाणकर ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते बांधकाम व्यवसायिकही आहेत.  त्यांना व्यवसायात आर्थिक नुकसान झाले होते.  त्यामुळे गौतम पाषाणकर यांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या मोटार चालकाला एक लिफाफा ताब्यात देऊन तो घरी देण्यास सांगितला. त्यानंतर त्यांनी चालकाला तुझे काही काम असेल तर करून ये असे सांगत मी पायी घरी येतो असे  सांगितले. त्यानुसार चालकाने तो लिफाफा घरी दिला.

पाषाणकर कुटुंबियांनी तो लिफाफा उघडून पहिला असता त्यात गौतम यांनी व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे मी आत्महत्या करत  असल्याचे नमूद केले आहे. असे शिवाजीनगर पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मुलाळे करीत आहेत.

गौतम पाषाणकर कुणाला आढळल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये (020 – 25536263) या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.