Major Shashi Cup Invitational District-Level Volleyball : पहिला मेजर शशी करंडक पटकावला फत्तेचंद बॉईजने

जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत विजेतेपद; प्रसाद धिवार स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू

एमपीसी न्यूज – फत्तेचंद बॉईज संघाने निर्विवाद वर्चस्वासह पहिल्या मेजर शशी चषक निमंत्रित जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविले. चिंचवड येथील शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी खडकवासला व्हॉलिबॉल क्लब संघाचा 25-14, 31-29 असा पराभव केला.

पुणे जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या (पीडीव्हीए) मान्यतेने अॅक्युमन स्पोर्ट अकादमी आणि अस्पायर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर शशिधरन नायर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

अंतिम सामन्यात फत्तेचंद बॉईज संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघावर निर्विवाद वर्चस्व राखले होते. पहिला सेट फत्तेचंदच्या खेळाडूंनी अगदी सहज जिंकला. त्यांच्या वैभव तावरे याच्या अप्रतिम खेळाने त्यांना हे शक्य झाले. खडकवासला संघासाठी आदित्य पाटिल याने सुरेख खेळ केला.

दुसऱ्या सेटमध्ये फत्तेचंदच्या खेळाडूंनी 15-6 अशा नऊ गुणांच्या आघाडीने झकास सुरवात केली. या वेळी विरेंद्र खाटमोडे आणि मोहंमद मुस्सादिक यांनी केलेले ब्लॉकिंग जबरदस्त होते. त्यानंतर खडकवासला संघाच्या खेळाडूंनी चिवट प्रतिकार करून पिछाडी 16-14 अशी भरून काढली होती. शुभम तापकीर आणि प्रसाद धिवार यांचा खेळ उल्लेखनिय ठरला. प्रसादच्या जबरदस्त खेळाने खडकवासला संघाचे आव्हान राखले होते. त्याने 15 गुणांची कमाई केली. यामुळेच तो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.

त्यानंतर दुसरा सेट बरोबरीतच सुरू होता. दोन्ही संघातील खेळाडूंनी आपला खेळ उंचावला होता. अखेरीस फत्तेचंद संघाने सेट 31-29 असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. वैभवने सामन्यात 17 गुणांची कमाई केली.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पहिले पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर, शहिद मेजर शशिधरन नायर यांच्या मातुश्री श्रीमती लता नायर, शिवाजी उदय मंडळचे अध्यक्ष सदाशिव गोडसे यांच्या हस्ते पार पडला.

निकाल –

  • उपांत्य फेरी – खडकवासला व्हॉलिबॉल क्लब (शुभम तापकिर, 15 गुण) वि.वि. डेक्कन जिमखाना अ 26-14, 25-20 (विशाल चेमटे 9 गुण)
  • फत्तेचंद बॉइज (मोहंमद मुसादिक 20 गुण) वि.वि. डीब्ल्यू स्पोर्टस 20-25, 25-18, 20-18 (अभिषेक सावंत 10 गुण)
  • तिसरा क्रमांक – डेक्कन जिमखाना अ (संकेत शिंदे 9 गुण) वि.वि. डीब्ल्यू स्पोर्टस 25-19, 23-25, 16-14 (ऋषिकेश सिद्धगवळी 7 गुण)
  • अंतिम सामना – फत्तेचंद बॉईज (वैभव तावरे 17 गुण) वि.वि. खडकवासला व्हॉलिबॉल क्लब 25-14, 31-29 (प्रसाद धिवार 15 गुण)

वैयक्तिक पुरस्कार –

  • सर्वोत्कृष्ट स्पायकर – वैभव तावरे (फत्तेचंद बॉईज)
  • सर्वोत्कृष्ट सेटर – सिद्धार्थ जगताप (खडकवासला व्हॉलिबॉल क्लब)
  • सर्वोत्कृष्ट अष्टपैलू – प्रसाद धिवार (खडकवासला व्हॉलिबॉल क्लब)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.